रत्नागिरी जिल्ह्यातील २११ गावे दरडग्रस्त, प्रशासनाकडून सज्जता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:54 PM2023-07-06T12:54:30+5:302023-07-06T12:56:10+5:30

प्रशासकीय यंत्रणांना सज्जतेचे आदेश

211 villages in Ratnagiri district are affected by landslides | रत्नागिरी जिल्ह्यातील २११ गावे दरडग्रस्त, प्रशासनाकडून सज्जता

रत्नागिरी जिल्ह्यातील २११ गावे दरडग्रस्त, प्रशासनाकडून सज्जता

googlenewsNext

रत्नागिरी : वर्ष २००५ पासून जिल्ह्यात पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढत आहे. यापैकीच एक म्हणजे जिल्ह्यात डोंगराळ भाग असल्याने गेल्या काही वर्षांपासून दरड कोसळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करता जिल्ह्यात संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये २११ गावांचा समावेश आहे.

वर्ष २००५ पासून जिल्ह्यात पावसाळ्यात भूस्खलन किंवा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील २११ गावांकडे विशेष लक्ष ठेवून असते. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांना पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गतवर्षी अनेक गावांमध्ये कोसळल्या दरडी

गत वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वादळी पाऊस झाला. यामुळे अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. चिपळूण येथील परशुराम घाट, आंबा घाट, तसेच अन्य काही भागांमध्ये दरडी कोसळल्याने काही मार्ग बंद राहिल्याने वाहतूक बंद होती. काही घरांवर, परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही तैनात

दरवर्षी पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात ठेवल्या जातात. या पावसाळ्यातही एनडीआरएफच्या तुकड्या जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी तैनात राहणार आहेत.

जिल्ह्यात ३०० आपदा मित्रांची फळी

रत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० आपदामित्र आणि सखी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तींमध्ये या आपदा मित्रांकडून मदत कार्य होणार आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने दरडप्रवण भागातील नागरिकांनाही स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.

प्रशासकीय यंत्रणांना सज्जतेचे आदेश

जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची पावसाळा पूर्व तयारीसाठी सर्व विभागांची बैठक घेऊन संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यास सांगितला होता. त्यानुसार सर्व विभागप्रमुखांना पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षी परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. दोन दिवसांपूर्वीच या घाटाची पाहणी करून या विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. - एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी.

Web Title: 211 villages in Ratnagiri district are affected by landslides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.