आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी २२ प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:32+5:302021-08-26T04:33:32+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून २२ प्रस्ताव आले आहेत. ...
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून २२ प्रस्ताव आले आहेत. प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाकडून दरवर्षी आदर्श शिक्षकांची निवड करण्यात येते. त्यांचा शिक्षक दिनी सन्मान करण्यात येतो. आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया एक महिन्यापूर्वी सुरू केली जाते. त्यानुसार शिक्षण विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे नऊ आणि विशेष पुरस्कार एक असे एकूण १० शिक्षकांची निवड केली जाते. गेली काही वर्षे काही तालुक्यातून एक एकच प्रस्ताव होता. त्यामुळे निकोप स्पर्धा होत नव्हती. त्यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्यातून किमान दाेन प्रस्ताव आलेच पाहिजेत, असे आदेश दिले, अन्यथा त्या तालुक्याला पुरस्कार दिला जाणार नाही, अशी तंबीही दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाभरातून २२ प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले. काही तालुक्यांतून तीन प्रस्ताव आलेले आहेत.
नुकत्याच संबंधित शिक्षकांच्या मुलाखती झाल्या असून, अंतिम यादी मान्यतेसाठी कोकण आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. शिक्षक दिन ५ सप्टेंबरला असल्यामुळे हे पुरस्कार त्यापूर्वी जाहीर केले जाणार आहेत. मात्र, सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेता पुरस्कार वितरण त्याच दिवशी होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.