चिपळुणातील २२२ आशा सेविका संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:48+5:302021-06-18T04:22:48+5:30
चिपळूण : तालुक्यातील २२२ आशा स्वयंसेविका व ११ गटप्रवर्तक गुरूवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार ...
चिपळूण : तालुक्यातील २२२ आशा स्वयंसेविका व ११ गटप्रवर्तक गुरूवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार भास्कर जाधव यांच्याकडे दिले आहे.
आशा सेविकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशा सेविका आणि गटप्रवर्तक रविवारसहित दररोज आठ तासांपेक्षा जास्त काम करतात. मनुष्याने कोरोनाबरोबर जगण्याची सवय लावली पाहिजे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. म्हणजे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना भविष्यामध्ये ७ ते ८ तास काम करावे लागणार आहे. म्हणूनच त्यांना इतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेत कायम केले पाहिजे, महाराष्ट्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, आशा स्वयंसेविकांना १८ हजार रुपये व गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये प्रतिमहा वेतन देण्यात यावे, ग्रामीण विभागातील आशा स्वयंसेविकांना कोरोनासंबंधित काम केल्याबद्दलचा भत्ता द्यावा, कोरोनाबाधित झालेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांचे उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटरसह बेड राखीव ठेवण्यात यावेत, त्यांना विनामूल्य उपचार देण्यात यावा, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनासंबंधित काम केल्यामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्या आदेशामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा स्पष्टपणे उल्लेख नाही, तो उल्लेख स्पष्टपणे करण्यात यावा. आशा स्वयंसेविकांना पोलिओ, कुष्ठरोग, चवरोग व सांसर्गिक रोग यांच्या सर्वेक्षणाचा थकीत मोबदला देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
---------------------------------
चिपळुणातील आशा सेविकांनी आमदार भास्कर जाधव यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.