गुहागर तालुक्यातील २२२ कुटुंबांना स्थलांतरणाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:30 AM2021-05-17T04:30:14+5:302021-05-17T04:30:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : तालुक्यात होणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यालगत धोका संभावणाऱ्या ३५ गावांतील २२२ कुटुंबांना स्थलांतरित होण्याचे आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : तालुक्यात होणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यालगत धोका संभावणाऱ्या ३५ गावांतील २२२ कुटुंबांना स्थलांतरित होण्याचे आदेश महसूल प्रशासनाने काढले आहेत़ वादळानंतर संभाव्य नुकसानीला सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन तयारी सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार लता धोत्रे यांनी दिली.
तालुक्यात नोव्हेंबर २००९ मध्ये झालेल्या फयान वादळाचा तडाखा सर्वाधिक गुहागर तालुक्याला बसला होता. यावेळी मच्छीमारांची जीवितहानीही झाली होती. यानंतर गतवर्षी झालेल्या निसर्ग वादळामध्ये दापोलीपाठोपाठ तालुक्यात नुकसान झाले होते. दोन्हीवेळा झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन यावेळी येणाऱ्या वादळानंतर आपत्कालीन स्थितीला आवश्यक मदतीची तयारी महसूल प्रशासनाने तयार ठेवली आहे. तसेच गुहागर पोलीसही संभाव्य आपत्कालीन स्थितीला तोंड द्यायला तयार झाले आहेत.
तालुक्यात गुहागर शहरासह हेदवी, वेळणेश्वर, कारुळ, बोऱ्या, बुधल, तवसाळ, रोहिले, अंजनवेल आदी किनारपट्टी भागातील भागात ग्रामपंचायतीमार्फत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागातील गावांना वादळामुळे धोका उद्भवू शकतो. अशा ३५ गावांतील २२२ कुटुंबांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत़ साखरीआगर येथील किनाऱ्यालगत असणाऱ्या ३५ घरांना साखरीआगर शाळा व अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याचे तहसीलदार धाेत्रे यांनी सांगितले.
-----------------------
स्थलांतरित हाेण्याचे आदेश देण्यात येणाऱ्या ३५ गावांमध्ये वेलदूर, घरटवाडी तर्फ वेलदूर, धाेपावे, तेरले, नवानगर, पेढ अंजनवेल, अंजनवेल, कातळवाडी तर्फ, रानवी, आरे, वाळी, पिंपळगाव, वरचापाट तर्फ, गुहागर, कीर्तनवाडी तर्फ, गुहागर, असगोली, गुहागर, मारुती मंदिर, पालशेत, वारभाई पालशेत, अडूर, वाडदई, बोऱ्या कारुळ, कोंडकारुळ, वेळणेश्वर, साखरीआगर, हेदवी, मुसलोंडी, उमराठ, कर्दे, नरवण, रोहिले, तवसाळ आदी गावांचा समावेश आहे.