२३ वर्षे गुंगारा देणारा चोरटा अटकेत
By admin | Published: September 9, 2014 11:57 PM2014-09-09T23:57:28+5:302014-09-10T00:28:29+5:30
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कामगिरी : लांजातील चोरी प्रकरणातील फरार आरोपी
रत्नागिरी : लांजा शहरात साथीदारांसह शाळा, पानटपरी आणि बंद घरांचे कुलूप फोडून तांब्या-पितळेच्या भांड्यांची चोरी करून तब्बल २३ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रकाश कृष्णा बागडी ऊर्फ आडावकर (रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे आज, मंगळवारी शिताफीने अटक केली. प्रकाश बागडी याने साथीदार मारुती ज्ञानदेव बोरपाळे, यशवंत आप्पा बागडी यांच्या साथीने १९९१ मध्ये लांजा शहरात रात्रीच्या वेळी एका शाळेचे, पानटपरीचे, तसेच बंद घराचे कुलूप फोडून आतील साहित्य, तांब्या-पितळेची भांडी लंपास केली होती. या संदर्भात लांजा पोलीस ठाण्यात ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे घेतले ताब्यात
आरोपी प्रकाश बागडी कोल्हापूर जिल्ह्यात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बागडी याच्या पत्त्यावर पाठविण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी त्याचे कोणीही नातेवाईक नव्हते. पथकाने हुपरी, रुकडी, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, आदी ठिकाणी कसोशीने शोध घेतला. त्यावेळी आरोपी हा कुरुंदवाड येथील कृष्णा नदीमध्ये मासेमारी करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.