गुहागर तालुक्यात २४ विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:04+5:302021-06-10T04:22:04+5:30
गुहागर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना रुग्णांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवून वाढता प्रसार रोखण्याचा प्रयत्न प्रशासन करत ...
गुहागर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना रुग्णांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवून वाढता प्रसार रोखण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. त्यासाठी गुहागर तालुक्यात तब्बल २३ ग्रामपंचायतींनी शाळेच्या इमारतीत, तर एका ग्रामपंचायतीने रुग्णालयाच्या स्वतंत्र इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.
तालुक्यातील कोतळूक, वेलदूर, शीर, साखरीआगर, आबलोली, पाटपन्हाळे, जानवळे, काताळे, पालपेणे, वेळणेश्वर, चिंद्रावळे, आरे, वेळंब, कोंडकारुळ, असगोली, पालशेत, तळवली, कुडली, पडवे, नरवण, चिखली, हेदवी, अडूर अशा २३ गावांनी शाळेच्या इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. अंजनवेल येथे युसूफ मेहर अली सेंटर रुग्णालयाच्या स्वतंत्र इमारतीत भाडेतत्त्वावर विलगीकरण कक्ष करण्यात आले आहे.
याबाबत गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी सांगितले की, गृह अलगीकरणातील लोक बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा विशेष उपचारांची गरज नाही, अशा कोरोना रुग्णांचे गावपातळीवरच संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा विलगीकरण कक्षावर ग्राम कृती दलाचे लक्ष असेल. यामध्ये आरोग्य विभागासह प्रशासकीय स्तरावरील मंडल अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका आदींपैकी एक संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. शक्य तिथे महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कंपनी मदत निधी तसेच दानशूर व्यक्तींकडून आवश्यक मदत स्वीकारली जाणार आहे. एखाद्याची व्यवस्था होत नसल्यास ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून कृती दलाच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केली जाणार आहे.
सध्या तालुक्यात रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी, मागील काही दिवसांचा अनुभव लक्षात घेता रुग्णसंख्या वाढल्यास या विलगीकरण कक्षांचा मोठा उपयोग होणार आहे. सध्या वेळणेश्वर कोविड सेंटर येथे ८० व आरजीपीपीएल सेंटर येथे १५ रुग्णांची व्यवस्था होते आहे. गुहागर नगरपंचायत माध्यमातूनही वेगळे विलगीकरण कक्ष करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत.
.....................
शासनाची विलगीकरण कक्षाची संकल्पना चांगली आहे; मात्र यामध्ये विविध विभागांचा सामावेश असल्याने यामध्ये चांगला समन्वय असणे गरजेचे आहे. अन्यथा रुग्णांची गैरसोय होऊ शकते. ग्रामपंचायत स्तरावर काम करत असताना, कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात येण्यास तयार नसतात. अशावेळी एका माणसामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होताना दिसत आहे. शासनाने संशयित रुग्णांना शासनाच्या विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक केले पाहिजे, तरच याचा खरा उपयोग होईल. अनेकवेळा गावात नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांची माहिती ग्रामपंचायतीला दिली जात नाही.
संजय पवार, सरपंच, पाटपन्हाळे