बँका चार दिवस बंद राहिल्याने जिल्ह्यातील २५ कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:31 AM2021-03-18T04:31:57+5:302021-03-18T04:31:57+5:30
रत्नागिरी : दोन दिवस आलेली सुटी आणि त्यांना जोडून दोन दिवस बँकांनी केलेला संप यामुळे सलग चार दिवस राष्ट्रीय ...
रत्नागिरी : दोन दिवस आलेली सुटी आणि त्यांना जोडून दोन दिवस बँकांनी केलेला संप यामुळे सलग चार दिवस राष्ट्रीय बँका बंद राहिल्याने जिल्ह्यातील सुमारे २५ कोटी रूपयांची उलाढाल या कालावधीत ठप्प झाली.
राष्ट्रीय बँकांना दर शनिवार आणि रविवार अशी सुटी असते. यावेळी १३ आणि १४ मार्च या दोन दिवशी शनिवार आणि रविवार होता. त्यानंतर सोमवार, दि. १५ आणि मंगळवार दि. १६ रोजी राष्ट्रीय बँकांनी देशस्तरावर संप पुकारला होता. केंद्र सरकारने दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली व त्याला आक्षेप घेत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँकिंग उद्योगातील नऊ संघटनांच्या शिखर संघटनेने १५ व १६ मार्च २०२१ रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला. देशभरातील जवळपास १० लाख बँक अधिकारी व कर्मचारी संपामध्ये सहभागी होते. यात जिल्ह्यातील सुमारे १५ राष्ट्रीय बँकांच्या सर्व शाखांमधील अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते.
या संपामध्ये अधिकारी वर्गाच्या चार संघटना व कर्मचारी वर्गाच्या पाच संघटना अशा एकूण नऊ संघटना व बँकिग उद्योगातील शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण देशातील व राज्यातीलही बँकिंग उद्योग ठप्प झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातीलही राष्ट्रीय बँका दोन दिवसांची सुटी आणि दोन दिवस संप असे सलग चार दिवस बंद राहिल्या. त्यामुळे या कालावधीत बँकांचे सर्व आर्थिक व्यवहार बंद राहिले. यात रोख रक्कम तसेच क्लिअरिंग व्यवहारही बंद राहिले. सर्वच आर्थिक व्यवहार बंद राहिल्याने या सर्व बँकांमधून होणारी एकूण २५ कोटींची उलाढाल या कालावधीत ठप्प झाली.