गणेशमूर्तींच्या किमतीत २५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:28 AM2021-07-26T04:28:53+5:302021-07-26T04:28:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचे संकट असल्याने यावर्षीही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. घरोघरी गणेशमूर्ती विराजमान करण्यात ...

25% increase in price of Ganesh idols | गणेशमूर्तींच्या किमतीत २५ टक्के वाढ

गणेशमूर्तींच्या किमतीत २५ टक्के वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचे संकट असल्याने यावर्षीही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. घरोघरी गणेशमूर्ती विराजमान करण्यात येत असल्याने गणेशोत्सवासाठी मूर्तीशाळा गजबजल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्तीच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

घरोघरी गणेशमूर्ती बसविण्यात येत असल्याने मूर्तिकारांकडे अनेक भाविकांनी आगाऊ आरक्षित करून ठेवल्या आहेत. इंधन दरातील वाढ, तसेच महागाईने रौद्ररूप धारण केले आहे. याचा परिणाम गणेशोत्सवावर होण्याची शक्यता आहे. पेण, कोल्हापूर येथून तयार गणेशमूर्ती विक्रीसाठी येत आहेत. बाजारात अद्याप गणेशमूर्ती दाखल झाल्या नसल्या, तरी त्यांच्या किमतीत यावर्षी २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पावसामुळे शाडू माती लवकर उपलब्ध न झाल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्तीसाठी लागणारी शाडू माती ही राजस्थान व गुजरातमधून येते. यावर्षी पावसामुळे माती मिळण्यात अडचणी आल्या. पाऊस थांबल्यानंतर माती यायला सुरूवात झाली. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. मूर्ती बनविण्यासाठी लागणारी मजुरीही वाढली. गतवर्षी मजुरांना दररोज ८०० रूपये रोजंदारी द्यावी लागत होती. यंदा ती एक हजार ते १,२०० रुपये झाल्याने गणेशमूर्तींच्या किमती वाढल्या आहेत.

पीओपी व शाडूच्या मूर्तीच्या दरामध्ये मोठा फरक आहे. शाडूची मूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती इतर राज्यातून येत असल्याने किंमत वाढते. ही माती अनेकदा वेळेवर उपलब्ध होत नाही. शाडूची मूर्ती सुकायला दहा दिवस लागत असल्याने खर्चाचे प्रमाणही वाढते. याउलट पीओपीची मूर्ती एका दिवसात वाळत असल्याने त्वरित रंगरंगोटी करता येते. या मूर्तीचे उत्पादन लवकर व मोठ्या प्रमाणात करता येते. या मूर्ती शाडूच्या मूर्तीच्या तुलनेत खूप स्वस्त असल्याने पीओपी मूर्तीला मागणी आहे. यावर्षी पीओपीच्या मूर्तीच्या किमतीतही वाढ झाली आहे. मात्र, पर्यावरणाबाबत होणाऱ्या जनजागृतीमुळे यावर्षी शाडूच्या मूर्तींना वाढती मागणी आहे.

Web Title: 25% increase in price of Ganesh idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.