मराठा आंदोलनाला हिंसक वळण, रत्नागिरी विभागातून एसटीच्या 'इतक्या' फेऱ्या केल्या रद्द
By मेहरून नाकाडे | Published: October 31, 2023 05:35 PM2023-10-31T17:35:22+5:302023-10-31T18:00:45+5:30
वातावरण निवळल्यानंतर बसफेऱ्या पूर्ववत करणार
रत्नागिरी : मराठा आरक्षण आंदोलनामुळे सोलापूर, बीड जिल्हा बंद असून अन्य जिल्ह्यातही आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागातून अक्कलकोट, नांदेड, लातूर, आंबेजोगाई, उस्मानाबाद, बीड, शिर्डी तसेच पुणे-स्वारगेट मार्गावरील एकूण २५ बसेस मंगळवारी (३१) रद्द करण्यात आल्या. रद्द केलेल्या बसफेऱ्यांबाबतची सूचना प्रत्येक आगारात लावण्यात आली आहे.
मराठा आरक्षण आंदोलन अन्य जिल्ह्यातून तीव्र करण्यात आले आहे. रत्नागिरी विभागातील प्रत्येक आगारातून अक्कलकोट गाडी सुटते. सोलापूर व बीड जिल्हा सोमवारपासून बंद असल्याने या मार्गावरील फेऱ्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून बंद करण्यात आल्या आहेत.
पुणे-स्वारगेट सह नांदेड, लातूर, उस्मानाबाद, शिर्डी मार्गावरील बसेसही रद्द करण्यात आल्या आहेत. दिवसभरात २५ फेऱ्या रद्द करण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या तरी या गाड्या बंद ठेवल्या असल्या तरी वातावरण निवळल्यानंतर बसफेऱ्या पूर्ववत करण्यात येतील असे विभागनियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.