तब्बल २५१ शाळा ठरल्या दुरूस्तीत नापास
By admin | Published: March 22, 2017 11:38 PM2017-03-22T23:38:04+5:302017-03-22T23:38:04+5:30
जिल्हा परिषद : साडेपाच कोटींच्या निधीची आवश्यकता
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सुमारे २५१ प्राथमिक शाळा नादुरुस्त झाल्या आहेत. या धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरुन शिक्षणाचे धडे घेत आहेत. मोडकळीस आलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ४६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथे घडलेल्या दुर्घटनेचा विचार करता नादुरूस्त शाळांचा प्रश्न लवकर मार्गी लावला नाही, तर मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे. सुमारे दीड लाख विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत असून, ९००० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. जिल्हा परिषदेच्या १०० प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे़
प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थीसंख्या कमी होत चालली असली तरी त्यांना नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असून, त्या कौलारु आहेत़ त्यामुळे शाळांच्या जुन्या इमारतींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे़ त्यामध्ये काही शाळांच्या छताचे लाकडी वासे तुटल्याने छतच मोडकळीस आले आहेत़ तसेच भिंतींना तडे गेल्याने धोकादायक स्थितीतही विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत़
जिल्ह्यात सुमारे २५१ प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे़
या नादुरुस्त शाळांची दुरुस्ती वेळीच होणे आवश्यक आहे़ या शाळाच्या दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला डीपीडीसीकडून निधी देण्यात येतो. मात्र, तोही निधी अपुरा पडत असल्याने दरवर्षी नादुरुस्त शाळांच्या संख्येत भर पडत आहे. या शाळा वेळीच दुरुस्त झाल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)