‘तेजस’च्या २६ प्रवाशांना आम्लेटमधून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:45 PM2017-10-15T22:45:32+5:302017-10-15T22:45:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : सहा महिन्यांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेमध्ये रविवारी अन्नामधून २४ प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी चारजणांची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या खानपान सेवेचे कॅगने वाभाडे काढले होते.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाबाबत माहिती घेतली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणानंतर कामथे रेल्वे स्थानकामध्ये दादर पॅसेंजर रेल्वे थांबविण्यात आली होती.
कोकण रेल्वे मार्गावरील करमाळी (गोवा) येथून तेजस एक्स्प्रेस रविवारी दुपारी १.१५ वाजता सुटली. दुपारी ३.१५ च्या दरम्यान ती चिपळूण येथील वालोपे रेल्वे स्थानक येथे दाखल झाली. तत्पूर्वी रत्नागिरी स्थानकाच्यापुढे या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना उलटीचा त्रास जाणवू लागल्याचे या ठिकाणी कार्यरत असणाºया तिकीट तपासनिसाच्या निदर्शनास आले. ही विषबाधा कटलेट, आम्लेट व ब्रेड या अन्नपदार्थांतून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, दुपारी १.४५ वाजता चिपळूण रेल्वे स्थानकाला दूरध्वनी केल्यानंतर ही रेल्वे चिपळुणात थांबवून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही गाडी सुमारे दीड तास थांबविण्यात आली.
तेजस एक्स्प्रेसमधील घटना समजताच चिपळूण रेल्वे स्थानकामध्ये आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, उपसभापती शरद शिगवण, पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी घटनास्थळी धाव घेऊन विषबाधा झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी मदतकार्य केले. त्यानंतर विषबाधा झालेल्या २४ प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये हरीश तोवर, साची नायक, मिनाज मोमीन, शोमिता डे, आदिती सावर्डेकर, विनेश कुमार, अरुण भाटिया, प्रणम कुमार, रणधीर नागवेकर, राहुल मंडल, संजय पत्र, सौरभ उबाळे, मार्टिन फर्नांडिस, शैतुन पत्रो, रईस मोमीन, सुशांत नाहक, नोमिता तिर्की, निहारिका जाधव, मोसेज डिसुजा, आरती शहा, रोहित टॅग, आशिका कुमार, नीलेश जाधव, आरव तोमर यांचा समावेश आहे. यापैकी चारजणांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात दाखल प्रवाशांबाबत अधिक माहिती कळू शकली नाही.
चिपळूण रेल्वे स्थानकामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून एसआरपी ग्रुप, ट्रॅकिंग फोर्स, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
...म्हणे आधुनिक सुखसोयींची गाडी!
गोव्यातील करमाळी आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणाºया तेजस एक्स्प्रेसचे, आधुनिक सुखसोयी असलेली सेमी हाय स्पीड गाडी म्हणून मोठा गाजावाजा करून जूनमध्ये उद््घाटन केले गेले होते. स्वचलित दरवाजे, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग पॉर्इंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती व्यवस्था, सेलिब्रिटी शेफ मेन्यू आणि कॉफी व्हेंडिंग मशीन या सोयींची मोठी प्रसिद्धी केली गेली होती.