रत्नागिरीत उद्या २,६०१ विद्यार्थी देणार ‘एमपीएससी’ संयुक्त पूर्व परीक्षा
By शोभना कांबळे | Published: April 29, 2023 03:36 PM2023-04-29T15:36:15+5:302023-04-29T15:36:29+5:30
परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार
रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी रत्नागिरी तालुक्यातील ८ उपकेंद्रावर हाेणार आहे. ही परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता या वेळेत घेण्यात येणार असून, या परीक्षेसाठी एकूण २,६०१ उमेदवार बसणार आहेत.
या परीक्षेची बैठक व्यवस्था रत्नागिरी शहरातील ८ उपकेंद्रावर करण्यात आली आहे. त्यामध्ये पटवर्धन हायस्कूल या उपकेंद्रावर बैठक क्रमांक RT००१००१ ते RT००१५०४, एम. एस. नाईक हायस्कूल RT००२००१ ते RT००२२४०, गोगटे जोगळेकर महाविद्यालय RT००३००१ ते RT००३४५६, मिस्त्री हायस्कूल RT००४००१ ते RT००४२६४, अजिजा दाऊद नाईक हायस्कूल RT००५००१ ते RT००५२१६, रा. भा. शिर्के हायस्कूल RT००६००१ ते RT००६२८८, नवनिर्माण महाविद्यालय एम.आय.डी.सी., मिरजोळे RT००७००१ ते RT००७२६४ आणि फाटक हायस्कूल RT००८००१ ते RT००८३६९ अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे. त्यानंतरच परीक्षा केंद्रात साेडण्यात येणार आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.