जिल्हा परिषदेच्या २६२ शाळांच्या इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:31+5:302021-06-16T04:41:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी जिल्ह्यातील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी जिल्ह्यातील २६२ शाळांच्या इमारती धोकादायक झाल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत. ४२ शाळांच्या पन्नास वर्गखोल्या नव्याने बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी २ कोटी ७७ लाख ३० हजार रुपयांची निधी प्राप्त झाला आहे. मात्र, एकूण ९०४ वर्गखोल्या नादुरूस्त असून, त्यासाठी २६ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपये निधीची आवश्यकता आहे.
अतिवृष्टी, वादळ यामुळे जुन्या इमारतींचे नुकसान होते. दरवर्षी प्रशासनाकडून सर्वेक्षण करून नादुरूस्त शाळा, वर्गखोल्यांची यादी तयार करण्यात येते. संबंधित शाळेच्या इमारतीसाठी किती निधी आवश्यक आहे, याबाबत आराखडा तयार करून शिक्षण विभागातर्फे शासनाकडे सादर केला जातो. जिल्ह्यातील २६२ धोकादायक शाळा ‘निर्लेखित’ जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवाय ९०४ वर्गखोल्या नादुरूस्त असल्याचे जाहीर करून त्यासाठी २६ कोटी ४६ लाख ५६ हजारांचा निधी आवश्यक आहे. निधी मंजूर झाल्यानंतरच या वर्गखोल्यांच्या दुरूस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रत्यक्ष शाळा भरलीच नाही. मुलांनी ऑनलाईन अध्ययन केले. यावर्षीही गतवर्षीप्रमाणेच स्थिती आहे. परंतु भविष्यात कोरोनाची संख्या कमी होऊन शाळा पुन्हा भरतील. त्यामुळे शासनाने धोकादायक शाळा, वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी परवानगी देऊन निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या मुले घरात असल्याने चिंता नाही. मात्र, भविष्यात वर्गखोल्यांची, शाळांची आवश्यकता आहे.
- रोहिणी पवार, पालक
प्राथमिक शाळांच्या जुन्या इमारती अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे कोलमडतात. सध्या कोरोनामुळे मुले घरीच राहून अध्यापन करीत आहेत. मात्र, शिक्षकांना अध्यापन व अन्य कामकाजासाठी शाळेत जावेच लागते. त्यामुळे नादुरूस्त शाळा किंवा इमारतीच्या दुरूस्तीसाठी मंजुरी देणे आवश्यक आहे. जीर्ण इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून निर्लेखित केल्या आहेत. त्यामुळे तो धोका नाही. परंतु नव्याने मंजुरी मात्र गरजेची आहे.
- संतोष पायरे, पालक
नादुरूस्त वर्गखोल्यांची संख्या व त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ४२ शाळांच्या ५० वर्गखोल्यांच्या इमारतीच्या बांधकामास परवानगी मिळाली असून, त्यासाठी चार कोटी २० लाखांचा निधी आवश्यक आहे. २ कोटी ७७ लाख ३० हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, २६२ शाळांच्या इमारती धोकादायक बनल्याने त्या इमारती मात्र निर्लेखित केल्या आहेत.
- निशादेवी वाघमोडे,
शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.
कोणत्या तालुक्यात किती धोकादायक?
मंडणगड १५
दापोली १५
खेड ४८
चिपळूण ४३
गुहागर २१
संगमेश्वर ५८
रत्नागिरी २२
लांजा २०
राजापूर २०