राजापुरातील २७ गावे इंटरनेटच्या प्रतीक्षेत
By admin | Published: November 14, 2014 10:53 PM2014-11-14T22:53:31+5:302014-11-14T23:16:02+5:30
कामकाज आॅनलाईन : ७४ गावांशी जोडणी यशस्वी
राजापूर : शासनाचा कारभार पारदर्शी राहावा, यासाठी ग्रामपंचायतींचे कामकाज आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तालुक्यातील १०१पैकी ७४ ग्रामपंचायतींना इंटरनेटची सुविधा प्राप्त झाली असली तरी २७ ग्रामपंचायतींना अद्याप ही सुविधा मिळालेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा पाया ठरवणाऱ्या ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुुरू केले असून, भरघोस निधीही विकासकामांसाठी येत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक ठरावा, यासाठी व तो लोकाभिमुख ठरावा म्हणून शासनाने ग्रामपंचायतींचे कामकाज आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी केंद्राने पंचायत राज इन्स्टीट्यूशन अकौंट्स (प्रिया) या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. त्यामुळे गावे इंटरनेटने जोडली गेली.
राजापूर तालुक्यात ग्रामपंचायतींचे कामकाज आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू असून, १०१ पैकी ७४ ग्रामपंचायतींना त्याचा लाभ झाला. उर्वरित २७ ग्रामपंचायती अद्याप त्या सेवेच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये आडवली, आेंगले, चिखलगाव डोंगर, जुवाठी, काजिर्डा व कुडावली, खडीकोळवण, कोळंब, मिठगवाणे, परटवली, पेंडखले, फुफेरे, वडवली, वडदहसोळ, माडबन, मोगरे, पांगरीखुर्द, शेजवली, शिवणे बु., शिवणे खुर्द, तळगाव, ताम्हाणे, वाल्ये, येरडव, झर्ये, मोगरे यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीना इंटरनेटची सुविधा केव्हा मिळणार ते निश्चित नाही. त्यामुळे शासनाच्या या लोकाभिमुख अभियानात अडथळे येत आहेत. ज्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटची सुविध यापूर्वी प्राप्त झाली आहे. त्यापैकी अनेक ग्रामपंचायतींना स्पीडअभावी इंटरनेट संथगतीने मिळत असल्याने कामकाजादरम्यान व्यत्यय येत आहे. त्यामुळे हे अडथळे कसे दूर करायचे ते मोठे आव्हान आहे. (प्रतिनिधी)