Ratnagiri: जयगड वायुगळतीमधील बाधित २९ विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात दाखल, ३१ जणांवर उपचार सुरू
By शोभना कांबळे | Updated: December 17, 2024 17:48 IST2024-12-17T17:47:46+5:302024-12-17T17:48:31+5:30
सखोल चौकशी हवी

Ratnagiri: जयगड वायुगळतीमधील बाधित २९ विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात दाखल, ३१ जणांवर उपचार सुरू
रत्नागिरी : उपचार घेऊन घरी गेलेल्या जयगड वायुगळतीमधील बाधित २९ विद्यार्थ्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह वायूगळतीमुळे त्रास झालेल्या दोन प्रौढांनाही आता त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात ३१ जणांवर उपचार सुरु आहेत.
गुरुवार, १२ रोजी जिंदल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे जवळच्याच जयगड माध्यमिक विद्यामंदिर येथील ६८ विद्यार्थ्यांना त्रास झाला. त्यातील पहिल्या ८ मुलांना वाटप प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर त्यानंतर ६० मुलांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळेल त्या वाहनाने या मुलांना रत्नागिरीत आणण्यात आले. यात विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.
जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. दोन दिवसांनी १४ डिसेंबर रोजी मुलांना घरी पाठवण्यात आले. मात्र, त्यातील २९ मुलांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केवळ मुलांनाच नाही तर आता प्रौढांनाही वायुगळतीमुळे त्रास झाला असल्याचे आता पुढे येत आहे. सोमवारी जयगड येथील दोन प्रौढांनाही रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता एकूण ३१ रुग्ण उपचार घेत आहेत.
सखोल चौकशी हवी
वायुगळती नेमकी कशामुळे झाली, याची सखोल आणि नि:पक्षपाती चौकशी व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व पालकांकडून व्यक्त केली जात आहे.