रत्नागिरी जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींचा कारभार आता नव्या इमारतीत, ३ कोटीचा निधी मंजूर
By रहिम दलाल | Published: February 23, 2024 01:23 PM2024-02-23T13:23:06+5:302024-02-23T13:24:33+5:30
स्वनिधीची अट रद्द
रहिम दलाल
रत्नागिरी : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र चकाचक नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने ३ कोटी ९ लाख रुपये मंजूर केले असून, लवकरच ही कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे आता या ग्रामपंचायतींचा कारभार नवीन इमारतीतून चालणार आहे.
गावासह वाडी, वस्त्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाची ध्येय - धोरणे ठरविली जातात. गावातील नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येते. प्रत्येक गावाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येते.
गेल्या काही वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोगातून कोट्यवधींचा निधी हा थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर थेट जमा केला जातो. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती नादुरुस्त आहेत. आजही काही ग्रामपंचायती स्वत:च्या मालकीच्या नसून त्या भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर गळती लागल्यामुळे काही ग्रामपंचायतींची कागदपत्रेही खराब झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यासाठी मोडकळीस आलेल्या इमारतींना नवा लूक देण्यासाठी नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत.
प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतींच्या नवीन इमारती बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो. त्याप्रमाणेच सन २०२३-२४ या वर्षामध्ये २० ग्रामपंचायतींना नवीन इमारती देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
अनुदान किती मिळणार?
एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या - १२ लाख रुपये
१ ते २ हजार लोकसंख्या - २० लाख रुपये
२ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या - २५ लाख रुपये
स्वनिधीची अट रद्द
यापूर्वीच्या योजनेमध्ये ग्रामपंचायतींना १५ ते २० टक्के स्वनिधीची अट घालण्यात आली होती. त्यामुळे ग्रामपंचायतींकडे इमारतच नाही, त्यांना स्वनिधीसाठीही धडपड करावी लागत होती. मात्र, ही अट रद्द करण्यात आल्याने ग्रामपंचायतींना आता इमारत बांधकामासाठी १०० टक्के निधी दिला जात आहे.
पाच वर्षात मंजूर झालेला निधी
वर्ष - मंजूर ग्रामपंचायती - रक्कम (लाखात)
२०१९-२० - ११ - १३५.००
२०२०-२१ - २० - २४०.००
२०२१-२२ - १६ - २३२.००
२०२२-२३ - २७ - ४२२.५०
२०२३-२४ - २० - ३०९.००
एकूण - ९४ - १३३८.००