रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाख बालकांना गोवर रूबेला लसीचे सुरक्षा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:27 PM2018-11-16T12:27:20+5:302018-11-16T12:32:08+5:30
बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या एमआर या गोवर - रूबेला प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. बालकांचे रक्षण करणाऱ्या लसीकरण मोहीमेचा प्रारंभ २७ रोजी शहरातील दामले विद्यालयात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या एमआर या गोवर - रूबेला प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. बालकांचे रक्षण करणाऱ्या लसीकरण मोहीमेचा प्रारंभ २७ रोजी शहरातील दामले विद्यालयात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोवर रूबेला हे विषाणूपासून होणारे आजार आहेत. त्यापासून मुलांचे रक्षण करण्यासाठी गोवर - रूबेला लसीकरण या राष्ट्रीय अभियानाची सुरूवात जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून होत आहे. याविषयी माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, डॉ. चंद्रकांत शेरखाने, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास कुलाळ तसेच अन्य अधिकारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ही लस ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविली जाणार असून शाळाबाह्य मुलेही यापासून वंचित राहू नये, यासाठी शाळा बाह्य ठिकाणीही गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम सुरू रहाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणीही लसीकरणासाठी १४१ फिरती पथके तैनात रहाणार आहेत. यासाठी आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यापासून नियोजन करण्यास सुरूवात केल्याने आता प्रशासन प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना यावेळी धन्यवाद दिले.