भरपाईचे ३० कोटी बाकी

By admin | Published: August 31, 2014 12:32 AM2014-08-31T00:32:03+5:302014-08-31T00:34:11+5:30

आंबा नुकसान : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

30 crores of compensation left | भरपाईचे ३० कोटी बाकी

भरपाईचे ३० कोटी बाकी

Next

रत्नागिरी : थ्रीप्स (फुलकिडे)मुळे आंबा पिकाच्या झालेल्या नुकसान भरपाई वाटपासाठी ५१.७७ कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी २१.५२ कोटी नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले असून, ३०.२५ कोटीचा निधी शिल्लक राहिला आहे. ही भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
सन २०११-१२मध्ये आंबा पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबापिक धोक्यात आले होते. त्यानंतर शासनाने बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नुकसानीची भरपाई आली आहे. मात्र आता ही भरपाई घेऊन जाण्यास बागायतदार पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. निम्म्यापेक्षा अधिक भरपाईचे अजून वितरण होणे बाकी आहे. त्यामुळे ही भरपाई निर्धारित वेळेत न नेल्यास ती शासनाच्या तिजोरीत पुन्हा जाण्याची शक्यता आहे.
सन २०११-१२मधील आंबा पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून जिल्ह्याला ५१ कोटी ७७ लाखाचा निधी प्राप्त झाला होता. पैकी २१ कोटी ५२ लाखाचे वाटप पूर्ण झाले आहे. मात्र, ३० कोटी २५ लाखाचा निधी शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील अनेक खातेदार, सहहिस्सेदार बाहेरगावी आहेत. त्यामुळे त्यांचे मदतीची रक्कम शिल्लक राहिली आहे.
त्याचबरोबर एकाच जमिनीत तसेच बागायतीत एकापेक्षा जास्त सहहिस्सेदार असल्यामुळे त्यांच्या परवानगी उपलब्ध होईपर्यंत भरपाई दिली जात नाही. कोकणात सहहिस्सेदाराचे जबाब मिळत नसल्याने आणि अनेक बागायतींमध्ये सहहिस्सेदाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे भरपाई नेण्यास शेतकरी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षे भरपाई येते, मात्र त्यातील बहुतांशी रक्कम पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या गणेशोत्सवासाठी अनेक मुंबईकर आपल्या गावाला आले आहेत. अशा सर्व खातेदार तसेच सहहिस्सेदारांनी आंबा झाडांची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक खाते क्रमांकाची छायांकित प्रत यासह कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक अथवा मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
संबंधित निधीचे वाटप लवकर न झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम परत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी २०११-१२ मधील आंबा नुकसानभरपार्इंची रक्कम घेतलेली नाही, त्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालयांशी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि नुकसान भरपाई घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
निम्मा निधी शिल्लक
नुकसान भरपाई वाटपासाठी ५१.७७ कोटीचा निधी उपलब्ध.
जिल्ह्यात २१.५२ कोटी नुकसान भरपाईचे वितरण, ३०.२५ कोटीचा निधी शिल्लक.
सन २०११-१२मध्ये आंबा पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव.
निधीचे वाटप लवकर न झाल्यास भरपाईची रक्कम परत जाण्याची भीती.
जिल्ह्यतील अनेक खातेदार, सहहिस्सेदार बाहेरगावी गेल्याने मदतीची रक्कम शिल्लक असल्याचा अंदाज.

Web Title: 30 crores of compensation left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.