गुहागरात एका महिन्यात ३० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:59+5:302021-05-05T04:50:59+5:30
तालुक्यात १७ मार्च, २०२०ला शृंगारतळी येथे काेराेनाचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला हाेता. तेव्हापासून ३१ मार्च, २०२१ वर्षभराच्या कालावधीत १७ ...
तालुक्यात १७ मार्च, २०२०ला शृंगारतळी येथे काेराेनाचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला हाेता. तेव्हापासून ३१ मार्च, २०२१ वर्षभराच्या कालावधीत १७ रुग्णांचा मृत्यू झाला हाेता. यावेळी मात्र वाढत्या रुग्णसंख्येबराेबर मृतांची आकडेवारीही वाढत आहेत.
गेल्या महिन्यातील मृतांची आकडेवारी पाहता, १ ते २० एप्रिल दरम्यान सरासरी एक दिवस आड तालुक्यात एक रुग्ण मृत पावत हाेता. २० ते ३० एप्रिल दरम्यान सरासरी दिवसाला दाेन रुग्ण मृत्यू पावत आहेत. यामधील बहुतांशी मृतांना गुहागर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत अग्नी दिला जात आहे. काही रुग्ण घरीच जास्त आजारी झाल्यानंतर, गंभीर स्थितीत गुहागर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सुविधा असल्याने उपचारासाठी आणले जाते. त्यामधून मृतांची संख्या वाढत असताना, या मृतांना अग्नी देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीकडे देण्यात आले. दरराेजच्या मृतांवर अग्नी देताना नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीबराेबरच काेराेना संसर्गाची भीती आहे.
नगरपंचायतीने यासाठी दहा कर्मचाऱ्यांची टीम तयार केली असून, यामध्ये बहुतांशी कंत्राटी कर्मचारी आहेत. यातूनच धाेक्याचे काम करीत असताना आधीच कंत्राटी कामगार असताना किमान पगारवाढ तरी करावी, अशी प्रतिक्रिया यावेळी या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.
..................................
तालुक्यात अद्यापपर्यंत एकूण २ हजार २७४ रुग्णांची नाेंद झाली असून, सध्या ३०९ हून अधिक रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर ७७७ गृहविलगीकरणात आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये वेळेणेश्वर काेविड केअर सेंटरमध्ये ४२, गुहागर ग्रामीण रुग्णालय २३, शृंगारतळी येथे ३५, कामथे रुग्णालय ४, डेरवण वालावलकर १३, रत्नागिरी रुग्णालय ४, चिपळूण लाइफ केअर २, पुजारी चिपळूण १, मुंबई येथे २ रुग्ण उपचार घेत आहेत.