मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात ३० वळणे होणार गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:30 PM2019-04-05T14:30:27+5:302019-04-05T14:44:55+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्नागिरी - मिºया व मुंबई - गोवा महमार्गावर केलेल्या पाहणीत ३० धोकादायक वळणे तथा अपघातप्रवण क्षेत्र आढळून आली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, तर मिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्नागिरी - मिºया व मुंबई - गोवा महमार्गावर केलेल्या पाहणीत ३० धोकादायक वळणे तथा अपघातप्रवण क्षेत्र आढळून आली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, तर मिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही महामार्गांच्या चौपदरीकरणामध्ये ही सर्व ३० धोकादायक वळणे गायब होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही महामार्ग वाहतुकीसाठी निर्धोक बनणार आहेत.
कोकणातील रस्ते हे डोंगर-दºयांमधून गेलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र उतार किवा तीव्र चढाचा रस्ता आहे. नागमोडी वळणेही अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरून तसेच मुंबई - गोवा महामार्गावरून विशेषत: रात्री व पहाटेच्या वेळी वळणांचा अंदाज न आल्याने आजवर अनेक मोठे अपघात झाले. त्यामध्ये जीवित हानीबरोबरच अनेक जखमींना कायमचे अपंगत्वही आले आहे. गेल्या काही वर्षात मुंबई-गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा अर्थात डेड ट्रॅक म्हणून ओळखला जात होता. या महामार्गाचा सर्वाधिक वापर कोकणवासियांकडून सणांसाठी, उन्हाळी हंगामात गावी येण्यासाठी केला जातो. त्यामुळेच गेल्या दोन दशकांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात होती.
सन २०१३मध्ये युपीए सरकारच्या काळात या महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात आलेल्या भाजपाप्रणित मोदी सरकारमधील मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कॉँक्रीटीकरणातून करण्याचा निर्णय घेतला व कामाला गती दिली. त्यानंतर आता अनेक वर्षे रखडलेल्या मिºया - रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
घाटमाथ्यावरून कोकणात येण्यासाठी कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग, तर मुंबईतून कोकणात येण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गाचा वापर होतो. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी घाट, भोस्ते घाट, महामार्गावरील कामथे, वेरळ, आंजणारी घाट व परिसरातील रस्ता हा वाहनचालकांसाठी अडचणीचा ठरत आला आहे. आतापर्यंत खेडमधील कशेडी घाटात वळसा घालून यावे लागत होते. आता चौपदरीकरणात कशेडी घाटात बोगदा खोदण्यात आल्याने काही किलोमीटर प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.
सध्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात आहे. मात्र, हे काम रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमध्ये रखडले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या दोन्ही महामार्गावरील धोकादायक वळणे, ठिंकाणे यांचे सर्वेक्षण केले. मिºया - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट येथील दख्खनचे वळण व नाणीज गावातील धोकादायक ठिकाणी बांधकाम विभागाने उपाययोजना केल्या आहेत. आता मुंबई - गोवा महामार्गावरील २८ ठिकाणीही उपाययोजना केल्या जाणार आहेत.
बांधकामकडून सर्वेक्षण
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेळी अनेक धोकादायक वळणे असलेल्या ठिकाणी रस्ता सरळ करण्यासाठी रेखांकन करण्यात आले आहे. वळणे कमी ठेवण्याचा प्रयत्न चौपदरीकरणाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात याबाबतचे सर्वेक्षण रत्नागिरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले.
३० ठिकाणे धोकादायक
बांधकाम विभागाने महामार्गावरील अपघातप्रवण तथा धोकादायक वळणांचा सर्वे केला असता ३० ठिकाणे धोकादायक आढळून आली. त्यामध्ये उधळे, भोस्ते घाट, आवाशी गाव, चिपळूणचा पागनाका, कोंंडमळा, आगवे-सावर्डे गाव, तुरळ गाव, आरवली, वांद्री, आंबा घाट, निवळी घाट, हातखंबा गाव, पाली, नाणीज, वेरळ, लांजा बाजारपेठ, कुवे, ओणी, कोदवली, राजापूर शहर भाग यांचा समावेश आहे.