३० गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:38+5:302021-07-28T04:33:38+5:30
रत्नागिरी: जिल्ह्यामध्ये गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका महावितरणाला बसला आहे. अनेक ठिकाणची उपकेंद्रे, ट्रान्सफाॅर्मर बंद पडली आहे. पावसामुळे बाधित ...
रत्नागिरी: जिल्ह्यामध्ये गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका महावितरणाला बसला आहे. अनेक ठिकाणची उपकेंद्रे, ट्रान्सफाॅर्मर बंद पडली आहे. पावसामुळे बाधित झालेल्या ७६१ गावांपैकी ७३० गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, तर ३१ गावे अद्यापही अंधारात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. पुरामुळे २० उपकेंद्रे ४ हजार ६०९ ट्रान्सफाॅर्मरचे नुकसान झाले.
शिवसंपर्क बैठक
खेड: तालुक्यातील भरणे गटात शिवसेना संपर्क अभियानांतर्गत तालुकाप्रमुख विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन तालुकाप्रमुख जाधव यांनी केले. पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या.
खड्डे बुजवा
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर टाकेवाडी ते लांजादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तसेच नवीन बनवलेल्या रस्त्यावर काँक्रिटला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, संबंधित ठेकेदार कंपनीने तत्काळ या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.
लालपरी धावणार
राजापूर : वरिष्ठांकडून आलेल्या आदेशाचे पालन करत, राजापूर तालुक्यातील एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख राजेश पाथरे यांनी दिली. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा लालपरी धावणार आहे. कोरोना महामारीमुळे तालुक्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने, एसटी सेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत.
दापोलीत वेबिनार
दापोली : दापोली अर्बन बँक शास्त्र महाविद्यालयात शारीरिक पोषण व बदलती जीवनशैली या विषयावर ऑनलाइन व्याख्यान पार पडले. यावेळ डेरवण रुग्णालयाच्या आहार तज्ज्ञ प्रलोभना देवरुखकर यांनी समतोल आहार, दैनंदिन जीवनातील अन्नग्रहणाच्या चुकीच्या सवयी, व्यायाम व सदृढता याविषयी मार्गदर्शन केले. या वेबिनारमध्ये १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
वृक्षारोपण कार्यक्रम
चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या १६५व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आले. यानिमित्त १,००० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री किर, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, राजाराम शिंदे, चेअरमन मंगेश तांबे.
उपमुख्यमंत्र्याची भेट
दापोली: रत्नागिरी शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांनी नुकतीच आमदार शेखर निकम यांच्यासमवेत विविध प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी संघाने दिलेल्या निवेदनावर पवार यांनी पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी पवार यांनी विविध प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
मंदिर जीर्णावस्थेत
खेड : तालुक्यातील चाटव- बौद्धवाडीतील समाज मंदिर गेली ४-५ वर्षांपासून जीर्णावस्थेत आहे. वाडीतील ग्रामस्थांनी सातत्याने ग्रामपंचायतीकडे डागडुजीसाठी लेखी निवेदन दिले, तरीही त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. शासनाकडून लाखो रुपये खर्चून समाज मंदिरे उभारण्यात येत आहेत.