रत्नागिरी जिल्ह्यातील दोन केंद्रावर ३ हजार उमेदवार देणार तलाठी परीक्षा
By शोभना कांबळे | Published: August 17, 2023 12:24 PM2023-08-17T12:24:27+5:302023-08-17T12:25:01+5:30
यावर राहणार बंदी
रत्नागिरी : पुणे येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक यांचेमार्फत महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी भरतीची परीक्षारत्नागिरी जिल्ह्यात आंबव (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी आणि लवेल (ता. खेड) येथील घरडा फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या दोन उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सुमारे ३०८७ उमेदवार देणार आहेत.
राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी या परीक्षा केंद्रावर १९, २०, २१, २६, २७, २८ ऑगस्ट २०२३ व ४ सप्टेंबर २०२३ रोजी परीक्षा हाेणार आहे. तसेच घरडा फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या केंद्रावर १७, १८, १९, २०, २१, २२, २६, २७, २८, २९, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी व १, ४, ५, ६, ८, १०, १३, १४ सप्टेंबर २०२३ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ प्रमाणे परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात म्हटले आहे.
यावर राहणार बंदी
- १०० मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील.
- परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाइल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल.
- कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल.
- परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.