रत्नागिरीतील भगवती बंदरात क्रुझ टर्मिनलसाठी ३०२ कोटीची तरतूद, रोजगाराची संधी उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 07:28 PM2024-08-24T19:28:54+5:302024-08-24T19:29:50+5:30

गेट वे सह अन्य जेट्टींसाठी ५७९ कोटी रु.खर्च करणार

302 crore provision for cruise terminal at Bhagwati port in Ratnagiri | रत्नागिरीतील भगवती बंदरात क्रुझ टर्मिनलसाठी ३०२ कोटीची तरतूद, रोजगाराची संधी उपलब्ध होणार

रत्नागिरीतील भगवती बंदरात क्रुझ टर्मिनलसाठी ३०२ कोटीची तरतूद, रोजगाराची संधी उपलब्ध होणार

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदरात क्रूझ टर्मिनल उभारण्यासाठी ३०२ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.
गाळ काढणे व खोदकाम करणे, धक्का तयार करणे, लाटरोधक भिंतीची उंची वाढविणे, टर्मिनल इमारत उभारणे, रस्ते, वाहनतळ व फुटपाथ उभारणे, संरक्षक भिंत उभारणे, विद्युतीकरण, सांडपाणी योजना, उद्यान, अग्निरोधक यंत्रणा उभारणे यासाठी हा निधी खर्च करण्यात येईल. या प्रकल्पासाठी राज्य सरकार ५० टक्के तर केंद्र सरकार ५० टक्के निधी देणार आहे.

राज्य सरकार २०२४-२५ मध्ये एक कोटी, २०२५-२६ मध्ये ७० कोटी तर २०२६-२७ मध्ये ८०.८१ कोटी असा १५१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी देईल. केंद्र सरकारही तेवढाच वाटा उचलेल.
भगवती बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून १९ किमी अंतरावर भगवती बंदर असून जवळच विमानतळदेखील आहे. सद्यस्थितीत मुंबई ते गोवा अशी फेरीसेवा जलेश व आंग्रिया या क्रूझद्वारे सुरू आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीमध्ये कुठेही थांबा नाही. त्यामुळे पर्यटकांना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पर्यटन स्थळे पाहता येत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन स्थळे ही भगवती बंदराच्या आसपास आहेत. त्यामुळे भगवती बंदर येथे सुसज्ज असे क्रूझ टर्मिनल विकसित केल्यास पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. परिणामी स्थानिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या सागरीमाला प्रकल्पांतर्गत हे काम होणार आहे.

याशिवाय, मोरा, ता. उरण येथे रो-रो जेट्टी बांधणे - ८८.७२ कोटी रु., खारवाडेश्री येथे जेट्टी व अन्य सुविधा निर्माण करणे - २३.६८ कोटी, कोलशेत, जि. ठाणे येथे जेट्टीचे बांधकाम करणे - ३६.६६ कोटी, मीरा-भाईंदर येथे जेट्टीचे बांधकाम ३० कोटी, डोंबिवली येथे जेट्टीचे बांधकाम २४.९९ कोटी, काल्हेर, जि. ठाणे येथे जेट्टीचे बांधकाम २७.७२ कोटी, गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लबजवळ जेट्टीची उभारणी व अन्य कामे २२९ कोटी, एलिफंटा येथे जेट्टीची सुधारणा व पर्यटक सुविधांच्या उभारणीसाठी ८७.८४ कोटी, उत्तन डोंगरी, जि. ठाणे येथे रो-रो जेट्टीचे बांधकाम ३०.८९ कोटी असा एकूण ५७९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Web Title: 302 crore provision for cruise terminal at Bhagwati port in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.