चिपळूण तालुक्यात ३०६ शस्त्रक्रिया
By admin | Published: September 3, 2014 11:30 PM2014-09-03T23:30:24+5:302014-09-04T00:04:42+5:30
कुटुंब कल्याण कार्यक्रम : स्त्रियांचे प्रमाण सर्वांत जास्त तर पुरुषांचे प्रमाण नगण्य
अडरे : लोकसंख्या कमी करण्यासाठी व वाढत्या लोकसंख्येवर आळा बसावा यासाठी शासनाने कुटुंब कल्याण नियोजन सुरु केले. गेल्या चार महिन्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत एकूण ३०६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण ३०० व पुरुषांचे ६ शस्त्रक्रिया केल्या आहेत. दोन मुलांवर २०६ तर दोन मुलींवर ४ जणांनी शस्त्रक्रिया करुन घेतल्या आहेत.
शासनाच्या आरोग्य विभागाने कुटुंब कल्याण कार्यक्रम सुलभ व्हावा यासाठी जनजागृती केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत अनेक सोयीसुविधाबरोबरच गरोदर माता व महिलांना व नवजात शिशुंना उपलब्ध करुन दिल्या आहेत. कुटुंब कल्याण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुटुंब संख्या नियंत्रित करुन वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाचा प्रयत्न असतो. हा कार्यक्रम तालुक्यातील प्राथमिक केंद्राअंतर्गत घेतला जातो. चिपळूण तालुक्याला यावर्षी १ हजार ३१९ चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी जुलै अखेरपर्यंत ३०६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कुटुंब कल्याण झालेल्या शस्त्रक्रिया त्यामध्ये रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला १५६ चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कापरे अंतर्गत ११३ चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. खरवते केंद्राला १३३ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दादर अंतर्गत १३७ चे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी २८ शस्त्रक्रिया झाल्या. शिरगांव अंतर्गत १४७ चे उद्दिष्ट होते. यापैकी ३६ शस्त्रक्रिया झाल्या. अडरे अंतर्गत १९१ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३० शस्त्रक्रिया झाल्या. सावर्डे अंतर्गत १९९ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४० शस्त्रक्रिया झाल्या. फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्या केंद्राला १०१ चे उद्दिष्ट होते. त्या उद्दिष्टापेक्षा जास्त ११४ शस्त्रक्रिया करुन आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. वहाळ १४२ चे उद्दिष्ट होते. ३५ शस्त्रक्रिया केल्या आहेत.
आरोग्य विभागाने विविध साथींच्या आजाराबाबत जनजागृती करण्याबरोबरच कुटुंब कल्याणचेदेखील ग्रामीण भागामध्ये जनजागृती केली आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आळा बसत आहे. (वार्ताहर)