सानुग्रह योजनेचे ३१ लाभार्थी
By admin | Published: May 24, 2016 09:52 PM2016-05-24T21:52:14+5:302016-05-25T00:30:33+5:30
राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना : शालेय विद्यार्थ्यांना सहाय्यभूत
रत्नागिरी : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी लाभार्थी ठरले आहेत. शालेय विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास विद्यार्थी अथवा त्याच्या कुटुंबीयांना मदतनिधी देण्यासाठी शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. २००३पासून या योजनेला प्रारंभ झाला आहे. गेल्या पाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्या २८, तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान वितरीत करण्यात आले.
शासनाने २००३मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एक रुपया घेण्यात येत होता. त्यानंतर सर्व रक्कम विमा कंपनीला देण्यात येत असे. अशा विद्यार्थ्यांला अपघात झाला तर अपघातग्रस्त विद्यार्थ्यास सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत असे. मात्र, योजना सुरू केल्यानंतर दोन वर्षात या योजनेत बदल करण्यात आले. विम्याच्या हप्त्याची विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणारी रक्कम शासनाकडून भरण्यात येत आहे. मात्र, एखाद्या विद्यार्थ्याला किरकोळ अपघात झाला, तर अनुदान देण्यात येत नाही. त्यामुळे गोरगरीब, गरजू विद्यार्थ्याना गरज असतानाही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यालाच मदतीचा हातभार लाभतो. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकाला प्रत्येकी ७५ हजार, तर अपंगत्व आलेल्या लाभार्थी विद्यार्थ्याला ३० हजार रुपये देण्यात येतात.
ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांची घरे यातील अंतर लांब असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यामुळे वाहनांच्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
गेल्या पाच वर्षात २८ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तर तीन विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. २०१०-११ मध्ये सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर एका विद्यार्थ्याला अपंगत्व आले. २०११-१२ मध्ये ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू , २०१२ - १३ मध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१३ - १४मध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१४ - १५ मध्ये सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू व दोघांना अपंगत्व, २०१५ - १६ मध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मृत्यूमुखी पडलेल्या २८ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना, तर तीन अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले. (प्रतिनिधी)
तेरा वर्षे : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ठरतेय मोलाची
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेने गेल्या १३ वर्षात अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांना अपघात होण्याचे हे प्रमाण नगण्य असले तरीही ज्या विद्यार्थ्यांना या घटनेतून जावे लागले, त्यांच्यासाठी ही योजना आणि या योजनेतून होणारे आर्थिक सहाय्य मोलाचे ठरत आहे.