लोटेतील थर्मोलॅब कंपनीतील ३२ कामगारांना अचानक कामावरून काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 02:52 PM2022-12-28T14:52:03+5:302022-12-28T14:52:42+5:30
कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आवाशी : गेले अनेक महिने हाताला द्यायला कामच नसल्याने कंपनी बंद करत असल्याचे कारण देत लाेटे (ता. खेड) येथील थर्माेलॅब कंपनीने मंगळवारी (२७ डिसेंबर) अचानक ३२ कामगारांना अचानक कामावरून काढले. कमी केलेल्या कामगारांमध्ये पाच महिलांचाही समावेश आहे. कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत कंपनी प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या कामगारांकडून माहिती घेतली असता आम्ही नेहमीप्रमाणे सकाळच्या पाळीत काम करण्यासाठी कंपनीत आठ वाजता आलो. मात्र, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रवेशद्वारावरच रोखून तुम्हाला आजपासून कामावर येण्यास बंदी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर तशा प्रकारची सूचना नोटीस त्यांनी प्रवेशद्वारावर लावल्याचेही सांगितले. कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला खूप विनंती केली. मात्र, व्यवस्थापन आपल्या निर्णयाशी ठाम राहिले आहे. कार्यालयीन कर्मचारी व व्यवस्थापकाला कमी करण्यात आले आहे.
याबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी हर्षा सावंत यांची भेट घेऊन माहिती घेण्यात आली. त्यांनी सांगितले की, ही कंपनी स्वतःचे असे कोणतेच उत्पादन घेत नाही. वसाहतीतील यूएसव्ही या कंपनीचे जॉबवर्क करते. काही दिवसांपूर्वी यूएसव्ही कंपनीने गुजरात - वडोदरा येथे स्वतःच्या मालकीची कंपनी स्थापन केली. त्यामुळे हे काम आमच्याकडून काढून घेतले. परिणामी आमच्याकडे कामगारांना काम देण्यासाठी कामच शिल्लक राहिलेले नाही. ही वस्तुस्थिती असून, याची कल्पना आमच्या सर्व कामगारांना आहे. त्यामुळे नाईलाजाने कंपनी बंद करणे भाग पडत आहे. आम्ही नियमानुसार कामगारांना देणे असणारी त्यांची देणी देऊन त्यांना सेवामुक्त करीत आहोत, असे सावंत यांनी सांगितले.
- कंपनीत अन्य एका विभागात ठेकेदारी पद्धतीचे काम सुरू आहे. त्या कामगारांचे काय?
- गेली तीस वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कामगारांना केवळ दोन महिन्याची ग्रॅज्युइटी?
- काही कामगार एका युनियनचे सभासद असून, युनियनच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
हिशाेबाचा धनादेश तयार
तसेच तुमचा या महिन्याचा पगार, सर्व लिगल ड्युज व दोन महिन्यांची ग्रॅज्युइटी असा सर्व हिशाेबाचा धनादेश तयार आहे तो घेऊन घरी जावे. इथून पुढे कामावर येऊ नये. आम्ही कंपनी बंद करीत आहोत, असेही सांगण्यात आले.