रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान
By मेहरून नाकाडे | Published: April 28, 2023 07:31 PM2023-04-28T19:31:56+5:302023-04-28T19:32:42+5:30
११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ११ हजार ११० मतदारांपैकी ३ हजार ४१५ मतदारांनी मतदान केले असून एकूण ३२.३७ टक्के मतदान झाले आहे. शनिवार दि.२९ एप्रिल रोजी निकाल असल्याने संचालकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान झाले. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली, सकाळी दहा वाजेपर्यंत ४०५, दुपारी १२ वाजेपर्यंत ८२० तर दुपारी ३ वाजेपर्यंत २ हजार ४६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ११ हजार ११० पैकी मतदारांपैकी ३ हजार ४१५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानापैकी ३२.३७ टक्के मतदान झाल्याचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघातून एक हजार ६२१ तर ग्रामपंचायत मतदार संघातून एक हजार ७९४ मतदारांनी मतदान केले.
बाजार समितीसाठी सहकार पॅनेलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र तीन अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक घ्यावी लागली. सहकार पॅनेलचे हेमचंद्र माने, गजानन पाटील, सुरेश कांबळे हे तीन संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.
सहकार पॅनेलमधून ठाकरे सेना, शिंदे गट यांना प्रत्येकी ४, भाजपा, काँग्रेसला प्रत्येकी २, राष्ट्रवादीला ५ जागा देण्यात आल्या आहेत. मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाले असून, ११ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी सायंकाळी मतदान पेटीत बंद झाले. शनिवार दि.२९ एप्रिल रोजी ला मतमोजणी होणार असून, संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.