३३ केव्ही उच्चदाब वाहिनीत बिघाड, रत्नागिरीकर अंधारात; कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने वीज पुरवठा पूर्ववत

By मेहरून नाकाडे | Published: June 16, 2023 03:32 PM2023-06-16T15:32:56+5:302023-06-16T15:33:51+5:30

रत्नागिरी : रत्नागिरीच्या हार्बर उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर बिघाड झाला व शहराला विद्युत पुरवठा करणारी ...

33 KV high pressure line failure, Ratnagirikar in darkness; Restoration of power supply due to tireless work of employees | ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीत बिघाड, रत्नागिरीकर अंधारात; कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने वीज पुरवठा पूर्ववत

३३ केव्ही उच्चदाब वाहिनीत बिघाड, रत्नागिरीकर अंधारात; कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने वीज पुरवठा पूर्ववत

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरीच्या हार्बर उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर बिघाड झाला व शहराला विद्युत पुरवठा करणारी ३३/११ केव्ही हार्बर व राहटाघर ही दोन उपकेंद्रे दि.१३ जून रोजी रात्री ९.३० वाजता बंद पडली. शहरातील ३५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा ठप्प झाला. याबाबतची सूचना उपकेंद्रातील यंत्रचालकाने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना दिली. तात्पुरती उपाययोजना करून रत्नागिरी शहर शाखाधिकारी कौस्तुभ वासावे यांनी पर्यायी विद्युत वाहिनीद्वारे २० मिनिटांच्या आत वीज पुरवठा पुर्ववत करून ग्राहकांना दिलासा दिला.

मात्र वीजपुरवठा वारंवार चालू-बंद होत असल्याने बिघाड शोधून दुरूस्ती करणे आवश्यक होते. त्यासाठी काैस्तुभ वासावे यांनी सहकारी जनमित्रांना घेत ३३ केव्ही विद्युत वाहिनीवरील बिघाड शोधण्यासाठी रात्रीची गस्त सुरु केली. अंधार, मुसळधार पाऊस अशा परिस्थितीत वीज कर्मचाऱ्यांची रत्नागिरीतल्या खालची आळी भागात हार्बर उपकेंद्र ते कुवारबाव उपकेंद्र या ३३ केव्ही विद्युत वाहिनीची गस्त सुरु होती. रात्रीची वेळ व कमी मनुष्यबळ असल्याने त्यांनी एमआयडीसी शाखाधिकारी गणेश पखवाने व शिरगांव शाखाधिकारी राम बोबडे यांच्याकडे सहकार्य मागितले. तातडीने दोघेही जनमित्रांसह मदतीला धावले. त्यावेळी क्रांतीनगरजवळील विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. 

बिघाड सापडला मात्र दोन वाहिन्या एकाच खांबावर असल्याने तो दुरूस्त करण्यासाठी शिरगाव उपकेंद्राचा विद्युत पुरवठा बंद करावा लागणार होता. शिवाय १३ मीटर उंचीचा वीजखांब, त्यावर चढून काम करणे कठीण होते. रात्री साडेबारा वाजता दुरूस्तीचे काम सुरू झाले. वीज खांबावर चढलेल्या रुपेश लांबे व मुकूंद चितळे, रवी विटकर, सत्यजित सणगरे यांनी विशेष परिश्रम घेत नादुरूस्त पिन इन्सुलेटर बदलून रात्री सव्वा एक वाजता तिन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत केला. ३५ हजार ग्राहकांच्या घरात पुन्हा उजेड आला. उजेड पेरणाऱ्या या वीज कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र वीज पुरवठा खंडित झालेनंतर नेमकी समस्या ओळखून वीजपुरवठा पूर्ववत करणे कसोटी असते. पावसाळ्यात तर जोखीम घेत जबाबदारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागत आहे.

Web Title: 33 KV high pressure line failure, Ratnagirikar in darkness; Restoration of power supply due to tireless work of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.