रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेत सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 11:46 AM2023-12-09T11:46:55+5:302023-12-09T11:47:09+5:30
विम्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी, गतवर्षीपेक्षा दोन हजार शेतकरी वाढले
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे गेली काही वर्षे आंबा, काजू शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच येत आहे. महागडी कीटकनाशके आणि खते वापरूनही हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होत आहे. अशावेळी फळपीक विमा योजनेमुळे नुकसानाची तीव्रता कमी होण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेतील सहभाग वाढत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.
फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर अंतिम तारीख होती. जिल्ह्यातील एकूण ३० हजार २५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शेवटच्या तारखेला सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकरी वंचित राहिल्याने नोंदणीसाठी दि. ४ व ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकरी सहभाग वाढला असून, आता सहभागी शेतकऱ्यांची संख्या एकूण ३४ हजार ६०५ इतकी झाली आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा, काजू पिकावर होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.
- आंबा पिकाचे शेतकरी - २८२६२
- काजू पिकाचे शेतकरी - ६३४३
- एकूण शेतकरी - ३४६०५
- कर्जदार शेतकरी - २८४९९
- बिगर कर्जदार - ६१०६
- आंबा पिकाचे क्षेत्र - १५६४६.८८ (हेक्टर)
- काजू पिकाचे क्षेत्र - ३९४५.८ (हेक्टर)
- एकूण क्षेत्र - १९५९२.६८ (हेक्टर)
- शेतकरी विमा हप्ता - २२७४४३१९३.१
- विमा संरक्षित रक्कम - २५८०७३९०४०
फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकरी
तालुका - शेतकरी - क्षेत्र
मंडणगड -३८९७ - १९०३.४१
दापोली - २८२४ - १३७२.२८
खेड - ३१४५ - १५५९.७
चिपळूण - ३१८९ - १८७०.९
गुहागर - १६९५ - ८९४.६५
संगमेश्वर - ६६४३ - ३२८०.५५
रत्नागिरी - ३४६४ - २५७६.०७
लांजा - ३८५४ - ३०४४.७५
राजापूर - ५८९४ - ३०९०.३७
एकूण - ३४६०५ - १९५९२.६८
फळपीक विमा योजनेचे सर्व्हर डाऊन असल्याने इच्छुक असूनही अनेक शेतकरी सहभागापासून वंचित राहिले होते. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाकडे सहभागासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. मुदतवाढीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असून सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी