रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, १ हजार ९४८ शेतकऱ्यांनी भरलेत अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:49 PM2018-04-05T18:49:19+5:302018-04-05T18:49:19+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३४ हजार २२२ शेतकऱ्यांना ६४ कोटी ३९ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अद्याप अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३४ हजार २२२ शेतकऱ्यांना ६४ कोटी ३९ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अद्याप अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीसाठी ३१ मार्चपर्यंत दिलेल्या मुदतवाढीचा लाभ १ हजार ९४८ शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान जाहीर करताना या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाखावरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. शासन निर्णयानुसार बँकांचे थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरुन दिली होती.
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २५ हजार ७४१ शेतकऱ्यांना ३० कोटी २९ लाख रूपयांचा लाभ मिळाला आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या ८ हजार ४८१ शेतकऱ्यांना ३४ कोटी एक लाख रूपयांचा लाभ मिळाला आहे.
जिल्ह्यातील १४ हजार ६४० थकबाकीदार शेतकऱ्यांना ४४ कोटी १९ लाखाची कर्जमाफी मिळाली आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या १० हजार ८६४ शेतकऱ्यांना २० कोटी ७९ लाख रूपयांचा लाभ मिळाला. राष्ट्रीयीकृत बँकेच्या ३ हजार ७७६ थकबाकीदार शेतकऱ्यांना २३ कोटी ४० लाखाची कर्जमाफी मिळाली आहे.
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १९ हजार ७३ शेतकऱ्यांना १८ कोटी १७ लाखाच्या ह्यप्रोत्साहनपर अनुदानह्ण योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १४ हजार ५८२ गाहकांना ९ कोटी २६ लाख प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या ४ हजार ४९१ ग्राहकांना ८ कोटी ९१ लाख रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे.
दीड लाखापेक्षा अधिक कर्ज थकीत असणाºया २३९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, त्यांचे दीड कोटी ९२ लाखांची कर्जमाफी झाली आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या २५ शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून २३ लाखांची माफी मिळाली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या २१४ शेतकऱ्यांना एक कोटी ६९ लाख रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सुरूवातीला २४ जुलै ते २० सप्टेंबर २०१७ अखेर आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले होते. परंतु काही शेतकऱ्यांना वैयक्तिक, तांत्रिक कारणास्तव दिलेल्या मुदतीत अर्ज भरता आले नाहीत.
ज्या शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही यापूर्वी अर्ज केलेला नाही, अशा शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी १ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत आॅनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार १ हजार ९४८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. तरीही या योजनेंतर्गत वंचित शेतकऱ्यांना त्यांचे आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता १ ते १४ एप्रिल अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे.
कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान
अपुऱ्या पावसामुळे खरीब/रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे उत्पादकता घटली. परिणामी नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतकरी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. थकबाकीदार राहिल्यामुळे बँकेकडून नव्याने पीक कर्ज घेता आले नाही. त्यामुळे राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यावेळी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे शासनाने घोषित केले होते.