गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३४ हजार पेट्या हापूस मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:29 AM2021-04-14T04:29:09+5:302021-04-14T12:28:57+5:30
Mango Ratnagiri : रत्नागिरी हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
गतवर्षी कोरोनामुळे वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील विक्री व्यवस्था बंद होती. त्यामुळे पाडवा असला तरी ग्राहकांनी खासगी विक्री केली होती. यावर्षी मात्र कोरोना संकट असतानाही वाशी व अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत आंबा विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी आंबा तोड करून पाडव्यानिमित्त विक्रीसाठी आंबा पाठविला आहे.
कोकणातून ३४ हजार १९ पेट्या विक्रीसाठी मार्केटमध्ये आल्या होत्या, तसेच अन्य राज्यांतून २५ हजार ९५३ क्रेटशिवाय अन्य ८० टन सुटा आंबा विक्रीसाठी उपलब्ध होता. हापूसची आवक कमी असल्याने दर बऱ्यापैकी टिकून आहेत. दोन हजार ते साडेचार हजार रुपये दराने आंबापेटी विक्री सुरू आहे.
दोन सत्रांत विक्री
कोरोना संकटामुळे वाशी मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी गर्दी होऊ नये, कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन सत्रांत खरेदी- विक्रीचा निर्णय घेतला आहे. सकाळी नऊ वाजता विक्री होणार असल्याने सकाळी ७ पर्यंत आंबा घेऊन वाहने वाशीमध्ये पोहोचतील, याचे नियोजन करावे. उशिरा दाखल होणाऱ्या वाहनातील आंब्याची विक्री दुपारनंतर होणार आहे.
दरवर्षी गुढीपाडव्यासाठी ६० ते ७० हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये विक्रीला येतात. मात्र, यावर्षी एकूणच आंबा कमी असल्याने आवक निम्म्यावर आली आहे. आवक घटल्यामुळे दर सध्या टिकले आहेत. दोन सत्रांत विक्री होणार असल्याने बागायतदारांनी नियोजन करून आंबा मार्केटमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत.
- संजय पानसरे,
संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी (नवी मुंबई)