कोकण रेल्वे मार्गावरील ३६ ठिकाणे ‘डेंजर झोन’

By admin | Published: May 24, 2016 01:29 AM2016-05-24T01:29:12+5:302016-05-24T01:29:24+5:30

संजय गुप्ता : धोकादायक कड्याला रेड सेन्सर बसविणार; ११ नवी स्थानके मंजूर

36 places on Konkan Railway route 'Danger Zone' | कोकण रेल्वे मार्गावरील ३६ ठिकाणे ‘डेंजर झोन’

कोकण रेल्वे मार्गावरील ३६ ठिकाणे ‘डेंजर झोन’

Next


सिंधुदुर्गनगरी : कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरणारी ३६ ठिकाणे ‘डेंजर झोन’ म्हणून जाहीर केली आहेत. म्हणूनच पावसाळ्यात कोकण रेल्वे वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने ९५० सुरक्षा कर्मचारी या धोकादायक ठिकाणी २४ तास पहारा देणार आहेत. तसेच धोकादायक कड्याच्या बाजूला ‘रेड सेन्सर’सारखी अद्ययावत यंत्रणा लावण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना निर्धोकपणे प्रवास करता येईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे महाप्रबंधक संजय गुप्ता यांनी दिली. तसेच कोकण रेल्वे मार्गावर नवीन ११ रेल्वे स्थानके मंजूर करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने केलेली पूर्वतयारी व प्रवाशांसाठी देण्यात येत असलेल्या सुविधांबाबतची माहिती देण्यासाठी कोकण रेल्वेने सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथ पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक बी. बी. निकम, उपप्रबंधक सिद्धेश्वर तेलुगु, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, सुनिल नारकर आदी अधिकारी उपस्थित होते.
यंदा सरासरीच्या ३० टक्के जास्त पावसाची जास्न शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे तीन ठिकाणी कंट्रोल रुम, वेर्णा व रत्नागिरी येथे मेडिकल व्हॅन सज्ज ठेवण्यात आलेली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरील केल्या गेलेल्या उपाययोजनांचे निरीक्षण रेल्वे सेफ्टी बोर्डाच्या कमिशनरनी केले असून त्यांनी सुचविलेल्या काही सूचनांची अंमलबजावणी
३१ मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
११ नवीन स्थानके
कोकण रेल्वे मार्गावर वाढलेली रहदारी पाहता रेल्वे स्थानकांची संख्या वाढविणे गरजेचे होते. हे पाहता कोकण रेल्वे मार्गावर ११ नवीन स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये सिंधुदुर्गातील खारेपाटण व आचिर्णे, रत्नागिरीतील वेरावली, पोमेंडी, काडवाई, कळंबोली, रायगडमधील इंदापूर, गोरेगाव रोड व सापे बाम्हणे या स्टेशनचा समावेश आहे. तर कर्नाटकमधील मिरजान व इंजानी यांचा समावेश आहे.
स्टेशन कोटा यापुढे रद्द होणार
प्रत्येक रेल्वे स्टेशनला आतापर्यंत स्वतंत्र कोटा ठेवण्यात आलेला होता. मात्र यापुढे तो कोटाच रद्द करण्याचे आदेश भारतीय रेल्वेने दिले आहेत. तसेच ज्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म अर्धवट स्थितीत आहेत अशा ठिकाणी निळ्या रंगाचे शटर बसविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
२५ मे रोजी रेल्वे हमसफर सप्ताह
या सरकारला २५ मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने २५ मे पासून रेल्वे हमसफर सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी दोन वर्षात कोकण रेल्वेने केलेल्या सर्व कामांची माहिती दिली जाणार आहे.
दुसरी कोकणकन्या सुरु करण्याचा विचार
कोकण रेल्वेला प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद व ओघ पाहता कोकणकन्या एक्स्प्रेस-२ सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वे प्रशासन करत आहे.
(प्रतिनिधी)

१५ दिवसांत सावंतवाडी टर्मिनसचे उद्घाटन
कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तीनही स्टेशनचे अद्ययावतीकरण प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत सावंतवाडीतील पहिल्या टप्प्यातील प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, प्लॅटफॉर्मची शेड करणे सुरु आहे तर, टर्मिनसच्या दृष्टीने बिल्डिंग, तिकीट घर व रेल्वे वॉशिंग प्लँटचे काम पूर्ण झाले आहे. येत्या १५ दिवसांत या टर्मिनसचे उद्घाटन करण्यात येईल. सावंतवाडी, कणकवली, कुडाळ येथे गर्दीच्या वेळेस प्रवाशांची गैरसोय होऊ नये व आरक्षित तिकिटे तत्काळ मिळावीत यासाठी जेडीबीएस सेवा स्टेशनजीकच सुरु करण्यात आली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.
हे आहेत आपत्कालीन ‘टोल फ्री’ नंबर
रेल्वेविषयक विविध माहितीसाठी १८००२३३१३३२ या टोल फ्री क्रमांकावर प्रवाशांना रेल्वेच्या आवागमनाची पूर्ण माहिती मिळू शकते. रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांना काही समस्या असल्या तर त्यांनी १८२ या नंबरवर संपर्क किंवा एसएमएस करायचा आहे. तर रेल्वेविषयक खानपान व अन्य तांत्रिक तक्रारीसाठी ९००४४७०७०० या नंबरवर एसएमएस करावयाचा असल्याचेही प्रबंधक संजय गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: 36 places on Konkan Railway route 'Danger Zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.