शिधापत्रिकेवरील ३७ टक्के सदस्यच आधारशी संलग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:15 PM2019-02-21T13:15:51+5:302019-02-21T13:17:42+5:30
सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
रत्नागिरी : सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्यात येत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ८० हजार ३७८ लोकसंख्येपैकी ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्यात आले आहेत. हे काम केवळ ३७ टक्के इतकेच झाले आहे.
सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा, तसेच पात्र व्यक्तींनाच याचा लाभ व्हावा या उद्देशाने शासनाच्या पुरवठा विभागाकडून २०१२पासून शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे बनावट शिधापत्रिकांना चांगलाचा चाप बसला आहे. या मोहिमेनंतर शिधापत्रिकेवरील धान्य योग्य व्यक्तींनाच मिळावे, या हेतूने शासनाने शिधापत्रिकेवरील सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकांशी जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. सध्या अंत्योदय आणि प्राधान्य गटालाच सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा लाभ मिळत आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकाला शिधापत्रिकेवर नमूद केल्याप्रमाणे धान्य वितरण केले जाते. तर राष्ट्रीय धान्य सुरक्षा योजनेत समावेश असलेल्या प्राधान्य गटाला शिधापत्रिकेवरील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य धान्य देण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१४पासून घेण्यात आला आहे.
प्राधान्य गटातील शिधापत्रिकेवरील एका तरी सदस्याचे आधारकार्ड संलग्न करण्याची सवलत सुरूवातीच्या काळात देण्यात आली होती. हे काम सुमारे ९० टक्के इतके पूर्णही झाले होते. पण त्यानंतर प्रत्येक सदस्यांचे आधार संलग्न करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार २०३ शिधापत्रिकेवरील ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्य आधार संलग्न करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत आधारशी संलग्न झालेल्या सदस्यांची संख्या कमी आहे. शिधापत्रिकेवरील सर्व सदस्य आधारशी संलग्न न झाल्यास त्या शिधापत्रिकेवरील धान्य वितरण थांबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
चौकट
आधार मशीनची संख्या कमी
आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्याचे कामी हाती घेण्यात आले असले तरी १२ वर्षाखालील मुल आणि ६० वर्षावरील ज्येष्ठांचे ठसे घेण्यात अडचणी येत आहेत. त्यातच जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी आधार मशीन सुरू असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.