कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ३७ टन काजू बी तारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:30+5:302021-04-19T04:28:30+5:30
रत्नागिरी : काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर उत्पादक शेतकऱ्यांकडील काजूसाठी शेतमाल तारण कर्ज योजना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...
रत्नागिरी : काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर उत्पादक शेतकऱ्यांकडील काजूसाठी शेतमाल तारण कर्ज योजना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येते. बाजार समितीकडे ३७ टन काजू बी तारण ठेवण्यात आले आहे. बाजारातील दराच्या ७५ टक्क्यांप्रमाणे काजू बीसाठी ८५ रुपये प्रमाणे ३२ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात काजू उत्पादनामुळे दीड ते दोन कोटींचे अर्थार्जन प्राप्त होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. शेतकऱ्यांकडे काजू पीक शेतमाल साठवणुकीच्या सुविधा नसतात. एकाचवेळी काजू बी बाजारात आली तर दर कोसळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांना काजू बी तारण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गतवर्षी लॉकडाऊन काळात काजू बीचे दर घसरलेले होते. बाजार समितीने ५६ रुपये किलोने तारण ठेवून शेतकऱ्यांना कर्ज दिले होते ९३ टन काजू बी तारण ठेवण्यात येऊन ५३ लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी काजू बीची विक्री केली असता किलोला १२० ते १३० रुपये किलो दर प्राप्त झाला होता. अडीचपट दर प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. यावर्षीही शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एप्रिल महिन्यातच तारण योजनेचा प्रारंभ झाला असून, लांजा येथील शेतकऱ्यांनी ३७ टन काजू तारण ठेवला असून त्यांना ३२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सध्या बाजारात काजू बीचा दर ११४ रुपये असून शेतमाल तारण योजनेंतर्गत ७५ टक्के दराप्रमाणे कर्जाची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
कोट
काजू बी तारण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी गोडाऊनपर्यंत माल घेऊन यावे लागत होते. मात्र, आता शेतकऱ्यांच्या शेताजवळच माल साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात बचत होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
- संजय आयरे, सभापती, रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी.