कसोप येथील गिरणी कामगाराची ३८ वर्षे प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:37+5:302021-08-13T04:35:37+5:30
रत्नागिरी : कसोप (ता. रत्नागिरी) येथील राजाराम लक्ष्मण शेलार हे मुंबईतील माॅडर्न मिल्स लि. कंपनीमध्ये १८ वर्षे लाईन जाॅबर ...
रत्नागिरी : कसोप (ता. रत्नागिरी) येथील राजाराम लक्ष्मण शेलार हे मुंबईतील माॅडर्न मिल्स लि. कंपनीमध्ये १८ वर्षे लाईन जाॅबर म्हणून कामाला होते. १८ जानेवारी १९८२ रोजी संप झाला. त्यामुळे त्यांना घरी बसावे लागले. या घटनेला ३८ वर्षे उलटून गेली. मात्र, संप मिटल्यानंतर त्यांना मिल्समध्ये १८ वर्षे काम केलेले असूनसुध्दा पुन्हा नोकरीवर घेण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर गिरणी कामगारांसाठी म्हाडांतर्गत देण्यात येणाऱ्या घरासाठी त्यांनी २०१० साली प्रस्ताव पाठवूनही अद्याप त्यांना या घराची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
राजाराम शेलार हे मुंबईतील माॅडर्न मिल्स लि. कंपनीमध्ये १६ जुलै १९६५ ते १७ जानेवारी १९८२ या कालावधीत लाईन जाॅबर म्हणून कामाला होते. १८ जानेवारी १९८२ रोजी संप झाला. हा संप आज ना उद्या मिटेल आणि आपण कामावर जाऊ, या आशेवर ते होते. मात्र, त्यानंतर संप मिटला तरी अद्याप त्यांना याबाबत काहीच कळविण्यात आले नाही. त्यांनी या मिल्समध्ये १८ वर्षे काम केलेले असूनसुध्दा त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आले नाही. संप झालेल्या गोष्टीला आता ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार शासनाने म्हाडांतर्गत गिरणी कामगारांना घरे देण्याचे ठरवले आहे. ही घरे लॉटरी पद्धतीने दिली जाणार आहेत, असे जाहीर करण्यात आले होते. यासाठी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १५ शाखांमधून अर्ज भरण्यात आले होते. त्यानुसार शेलार यांनीही ५ ऑक्टोबर २०१० साली अर्ज केला. परंतु, अजूनही त्यांच्या या अर्जाची दखल घेतली गेलेली नाही. याबाबतही त्यांचा सातत्याने म्हाडाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.
नोकरीच्या प्रतीक्षेत ३८ वर्षे घालविलेले राजाराम शेलार आता म्हाडाच्या घरासाठीही गेल्या दहा वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत.