रत्नागिरी जिल्ह्यातील ३,९७२ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 05:21 AM2018-08-07T05:21:36+5:302018-08-07T05:22:19+5:30
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पावणेदोन महिने उलटले तरी शासनआदेश न आल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ३९७२ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत.
रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पावणेदोन महिने उलटले तरी शासनआदेश न आल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ३९७२ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ३९७२ शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये संवर्ग १, २, ३, ४ यानुसार बदल्या होणार आहेत. यामध्ये २० शाळांचा पर्याय ठेवण्यात आलेला आहे. संवर्ग १ व २ मध्ये येणाऱ्या शिक्षकांना मागेल ती रिक्त असलेली शाळा देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासकीय बदल्याही शिक्षण विभागाला कराव्या लागणार आहेत. दरम्यान, शिक्षण समितीमध्ये सुगम व दुर्गम यादीला मंजुरी मिळाल्याशिवाय शिक्षकांच्या बदल्या होऊ न देण्याचा ठरावही केला होता. हा ठराव शासनाकडे पाठवण्यात आला होता.
जिल्हा परिषदेने सुरूवातीला ९६७ दुर्गम शाळांची यादी तयार केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करून तसेच जिल्हा परिषद सदस्यांकडून मागवलेल्या माहितीवरून नवीन यादी तयार करण्यात आली. ही यादी १६४३ प्राथमिक शाळांची होती. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करताना नवीन सुगम व दुर्गम शाळांच्या यादीनुसार कराव्यात. जुन्या यादीनुसार करू नयेत.
तसेच बदल्या केल्यास त्या कोणत्याही परिस्थिती होऊ न देण्याचा निर्णय शिक्षण समित सभेत घेतला होता. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांवरून होणाºया गोंधळामुळे ग्रामविकास विभागाने थेट राज्यस्तरावरून आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याचे नवे स्वतंत्र धोरण दि. २७ फेब्रुवारी २०१७च्या परिपत्रकानुसार अंमलात आणले. चालू सत्रामध्ये या विभागाने ३१ मे, २०१८पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठरवली.
शासनाच्या या नव्या धोरणामुळे येत्या शैक्षणिक वर्षात अनेक शिक्षकांच्या शाळा बदललेल्या असणार, असे गृहीत धरून त्यादृष्टीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या बदल्यांची तयारी केली होती. मात्र, काही शिक्षक न्यायालयात गेल्याने ही बदल्यांची प्रक्रिया पुढे गेली. त्यातच शिक्षक मतदारसंघ निवडणूक, कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुक आचारसंहिता लागल्याने या बदल्या पुढे गेल्या.
त्याचबरोबर शिक्षक संघटनांनीही या बदल्यांना विरोध केला होता. जिल्ह्यात किती शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे आहेत, याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. तरीही शिक्षक बदल्यांचे अजूनही आदेश न आल्याने या बदल्या रखडल्या आहेत.