सात महिन्यांत मद्य तस्करीत ४०० जणांना अटक; ६७१ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:45+5:302021-07-19T04:20:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : रत्नागिरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि त्या-त्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी जिल्हाभरात वर्षभरात धडाकेबाज ...

400 arrested for liquor smuggling in seven months; 671 cases registered | सात महिन्यांत मद्य तस्करीत ४०० जणांना अटक; ६७१ गुन्हे दाखल

सात महिन्यांत मद्य तस्करीत ४०० जणांना अटक; ६७१ गुन्हे दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : रत्नागिरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि त्या-त्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी जिल्हाभरात वर्षभरात धडाकेबाज कारवाई केली आहे. केवळ ७ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६७१ गुन्हे दाखल झाले असून, चारशे लोकांना अटक करण्यात आली तर ३ कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे. विशेष करून गोवा बनावटीची दारू तस्करी हा कळीचा मुद्दा बनला असून, या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या दारूची तस्करी व हातभट्टीविरोधात मोहीम उघडली आहे. अनेक दिवस ही कारवाई सुरू असून, तस्करांनी त्याचा धसका घेतला आहे. तरीही चोरट्या स्वरूपात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी सुरू असून, ठिकठिकाणी जंगलामध्ये गावठी दारू गाळली जात आहे. त्यामुळे सातत्याने कारवाई करूनदेखील ही समस्या सुटलेली नाही. उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यामध्ये ६७१ गुन्ह्यांपैकी ३९७ वारस गुन्हे, २७४ बेवारस गुन्हे दाखल करून तब्बल ४०० लोकांना अटक करण्याची कामगिरी बजावली आहे. यामध्ये अकरा वाहने जप्त करण्यात आली असून, साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त झाला आहे. १ जानेवारी ते ११ जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

मध्यंतरी चिपळूणमध्ये गोवा बनावटीचे मद्य घेऊन जाणारा ट्रक मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभार्ली घाटात पकडला. यामध्ये कोट्यवधींची दारू हस्तगत करण्यात यश आले. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर चोरट्या पद्धतीने गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी व राजापूरमधील अधिकाऱ्यांकडून सातत्याने ही कारवाई होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य, निरीक्षक शरद जाधव, सुरेश पाटील, शंकर जाधव, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, किरण पाटील तसेच या खात्यातील त्या-त्या तालक्यातील अधिकाऱ्यांनी या कारवाया यशस्वी केल्या आहेत.

------------------------------

दारूच्या तस्करीसाठी चिपळूण बनतेय मध्यवर्ती केंद्र

गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीसाठी चिपळूण हे मध्यवर्ती केंद्र मानले जात आहे. मुंबई ते गोवा दरम्यानचे मध्यवर्ती ठिकाण, गुहागर-विजापूर रस्ता, कोकण रेल्वे यामुळे चिपळूण हे तस्करीचे केंद्र बनल्याचे पुढे येत आहे. या विभागाने टाकलेल्या अनेक धाडीत चिपळूणमध्येच मोठी कारवाई करण्यात आली आहे. यानंतर खेड, राजापूर तालुक्याचा समावेश आहे. अनेकवेळा चिपळुणातील राष्ट्रीय महामार्गावरून रात्री-अपरात्री या दारूची तस्करी होते, हे आजवर पडलेल्या धाडींतून पुढे येत आहे.

170721\1657img-20210630-wa0019.jpg

मद्य तस्करी: ४०० जणांना अटक; ७ महिन्यात ६७१ गुन्हे दाखल

Web Title: 400 arrested for liquor smuggling in seven months; 671 cases registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.