रत्नागिरी स्मार्ट सिटी बनविण्यासाठी ४०० कोटी मंजूर, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:19 PM2024-09-27T15:19:32+5:302024-09-27T15:19:59+5:30
महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपाबाबत बाेलणे म्हणजे..
रत्नागिरी : जिल्ह्याचे ठिकाण असलेले रत्नागिरी शहर हे स्मार्ट सिटी बनावे, यासाठी महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने ४०० काेटी रुपये मंजूर केल्याची माहिती राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याची निविदाही काढण्यात आली असून, त्याचे भूमिपूजन ५ किंवा ६ ऑक्टाेबर राेजी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने तळाेजा दत्तक घेऊन स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी स्मार्ट सिटी बनविण्यात येणार आहे.
महामंडळाने वाटद एमआयडीसी, रिळ एमआयडी, स्टरलाइटची ५०० एकर जागा, मंडणगड, राजापूर येथे हाेणारी एमआयडीसी यांचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण असणारे रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी बनावं यासाठी ४०० काेटी रुपये मंजूर केले आहेत. रत्नागिरी शहरातील सगळ्या शाळा, शहरातील सगळे रस्ते, ‘आयआयटी’कडून अभ्यास केलेली ड्रेनेज सिस्टिम, ताेरण नाला या सर्व बाबी स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आल्या आहेत.
तसेच ग्रामीण भागात ज्या एमआयडीसी आहेत, त्याला लागून असलेल्या शाळा, पाखाड्या त्यामध्ये घेतलेल्या आहेत. रत्नागिरी स्मार्ट सिटी बनणे हे माझे स्वप्न नव्हते तर ते रत्नागिरीकरांचे स्वप्न आहे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
‘ताे’ लाेकशाहीचा भाग
शरद पवार हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी कुठल्या मतदारसंघात जावे, कुठल्या मतदारसंघात जाऊ नये हा लाेकशाहीचा भाग आहे. त्यामुळे टिप्पणी करणे याेग्य नाही. अजित पवार यांच्याबाबतची बातमी धादांत खाेटी आहे.
‘त्यांचे उमेदवार लक्षलाभ’
महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपाबाबत बाेलणे म्हणजे महाविकास आघाडीला नाहक माेठे करण्यासारखे आहे. ज्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील २८८ जागांमध्ये आघाडी हाेऊनही उमेदवार मिळत नाही अशांनी अनेकवेळा आम्हाला सल्ला दिला आहे. त्यांचे उमेदवार त्यांना लक्षलाभ आहेत.