रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची दांडी, गतवर्षापेक्षा यंदा ४०० मिलिमीटर पाऊस कमी
By शोभना कांबळे | Published: August 18, 2023 05:38 PM2023-08-18T17:38:40+5:302023-08-18T17:39:06+5:30
उन्हाचा कडाका वाढला
रत्नागिरी : जिल्ह्यात १९ जुलैपासून पडलेल्या मुसळधार पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी ओलांडली असली तरी आता पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे पुन्हा सरासरी घटू लागली आहे. सध्या पावसाच्या किरकोळ सरीच कोसळू लागल्या आहेत. मात्र, उन्हाचा कडाकाही वाढला आहे.
पावसाने जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जोरदार सुरुवात करून नागरिकांना दिलासा दिला होता. या पंधरा दिवसांपैकी तीन चार दिवसात झालेल्या पावसाने दोन महिन्याची एकूण सरासरी ओलांडली तसेच गेल्या वर्षीची आकडेवारीही ओलांडली होती. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा गेल्या वर्षीपेक्षा पावसाची आकडेवारी कमी झाली आहे.
गेल्या वर्षी १८ ऑगस्टपर्यंत २८०० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस जिल्ह्यात पडला होता. तर यंदा याच तारखेपर्यंत २४०० मिलीमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षापेक्षा यंदा ४०० मिलिमीटर पाऊस कमीच झाला आहे. आता दिवसभरात एखादी सर पडते. मात्र, पुन्हा उन्हाला सुरुवात होते. त्यामुळे पाऊस थांबताच आता उकाड्याला सुरुवात झाली आहे.