राजापुरातील ४० हजार रेशनकार्डधारकांना मिळणार माेफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:24+5:302021-04-27T04:32:24+5:30

राजापूर : कोरोना महामारीमुळे संपूर्ण सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याच परिणाम प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर झाला ...

40,000 ration card holders in Rajapur will get free foodgrains | राजापुरातील ४० हजार रेशनकार्डधारकांना मिळणार माेफत धान्य

राजापुरातील ४० हजार रेशनकार्डधारकांना मिळणार माेफत धान्य

Next

राजापूर : कोरोना महामारीमुळे संपूर्ण सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याच परिणाम प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर झाला आहे. मात्र, अशा मजूर असलेल्या रेशनकार्डधारकांना दिलासा देताना राज्य सरकारने मे महिन्याचे रेशनदुकानावरील धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील सुमारे ४० हजार रेशनकार्डधारकांना मे महिन्यामध्ये मोफत धान्य मिळणार आहे.

गतवर्षी कोरोना महामारीमुळे २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्यावेळी अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला, नोकऱ्या गेल्या. याशिवाय मजुरी मिळत नसल्याने हातावर पोट असणाऱ्यांची फारच मोठी गैरसोय झाली. यामध्ये सर्वच भरडले गेले. त्यावेळी केंद्र सरकारने मोफत धान्य देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला होता. मात्र, पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने १५ एप्रिलपासून प्रथम संचारबंदी, नंतर संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी गेल्यावर्षीची पुनरावृत्ती झाली. प्रामुख्याने मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले. सर्वसामान्यांची आबाळ सुरू झाली आहे.

सर्वसामान्यांची आबाळ होऊ नये यासाठी मे महिन्याचे रेशनवरील धान्य मोफत देण्याचा दिलासादायक निर्णय यावेळी राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ तालुक्यातील सुमारे ४० हजार रेशनकार्डधारकांना होणार आहे. प्राधान्यकम व अंत्योदय गटातील लाभार्थींचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून सध्या रेशन ग्राहकांना तीन रुपये दराने माणसी तीन किलो तांदूळ व दोन रुपये दराने माणसी दोन किलो गहू वितरित केले जाते. याच प्रमाणात मे महिन्यासाठी धान्य मोफत दिले जाणार आहे. धान्य वितरणाची कार्यवाही पुरवठा विभागाकडून करण्यात येणार असून, धान्य वितरित केल्याबद्दल रेशन दुकानदारांना सरकारकडून कमिशन दिले जाणार आहे.

Web Title: 40,000 ration card holders in Rajapur will get free foodgrains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.