Ratnagiri: घरातील गुप्तधन काढून देतो असे सांगून महिलेला घातला ४१ लाखाला गंडा, साताऱ्यातील तिघांवर गुन्हा दाखल
By अरुण आडिवरेकर | Published: August 30, 2023 04:35 PM2023-08-30T16:35:33+5:302023-08-30T16:36:11+5:30
हर्षल शिराेडकर खेड : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला ती राहत असलेल्या घरातील गुप्तधन तांत्रिक पूजा, होम हवन करून ...
हर्षल शिराेडकर
खेड : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला ती राहत असलेल्या घरातील गुप्तधन तांत्रिक पूजा, होम हवन करून काढून देतो असे सांगून तब्बल ४१ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार १ मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत खेड तालुक्यातील भरणे येथे घडला आहे. याप्रकरणी साताऱ्यातील भाेंदूबाबासह त्याच्या इतर दाेन साथीदारांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोंदूबाबा प्रसाद हरीभाऊ जाधव (४७, रा. गिरेवाडी, ता. पाटण जि. सातारा), विवेक यशवंत कदम (४८, रा. करंजवडे ता. पाटण, जि सातारा), ओंकार विकास कदम (२३, रा. करंजवडे ता पाटण जि. सातारा) अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी विठाबाई आण्णाप्पा पवार (४८, रा. गणेशनगर-भरणेनाका, ता. खेड जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.
विठाबाई पवार या माेलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. त्या राहत असलेल्या घरात गुप्तधन असून, यासाठी तांत्रिक पूजा, धार्मिक विधी व जादूटोणाचे उपाय करुन हे गुप्तधन काढून देताे, असे भाेंदूबाबत प्रसाद जाधव याने त्यांना सांगितले. त्यासाठी घरात तंत्रमंत्र वाचून, पूजापाठ करुन तसेच होमहवन आणि इतर धार्मिक विधीसाठी करण्यासाठी पैसे लागतील असेही त्याने सांगितले. त्यासाठी त्याने विठाबाई पवार व त्यांच्या नातेवाईकांकडून वेळाेवेळी एकूण ४० लाख ६५ हजार रुपये घेतले.
त्यानंतर विठाबाई यांचा मुलगा रोहित यांच्या ग्रहशांती करण्यासाठी या भोंदूबाबाने २५ हजार रुपये वेगळे मागून घेतले. भाेंदूबाबा प्रसाद जाधव आणि त्यांच्या दाेन साथीदारांनी तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी खेड पाेलिस अधिक तपास करत आहेत.