रत्नागिरी जिल्ह्यात ४३ लाखाचा ध्वज दिन निधी संकलित
By शोभना कांबळे | Published: December 10, 2024 06:26 PM2024-12-10T18:26:50+5:302024-12-10T18:27:37+5:30
रत्नागिरी : आपले सैनिक सीमेवर रात्रंदिवस देशाचे रक्षण करीत आहेत. त्यामुळेच आपण शांततेची झोप घेत आहोत. त्यांच्या या कर्जातून ...
रत्नागिरी : आपले सैनिक सीमेवर रात्रंदिवस देशाचे रक्षण करीत आहेत. त्यामुळेच आपण शांततेची झोप घेत आहोत. त्यांच्या या कर्जातून आपण कधीही उतराई होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावर्षी जिल्ह्यात ४३,१३,५३१ रुपयांचा ध्वज दिन निधी संकलित करण्यात आला.
अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजू सावंत, जिल्हा पुरवठा अधिकारी मारुती बोरकर, भूसंपादन विभाग (कोकण रेल्वे)च्या उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिराजदार, नायब तहसीलदार माधवी कांबळे, अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे, माजी सैनिक आणि पत्रकार अरुण आठल्ये उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर अपर जिल्हाधिकारी बर्गे यांच्या हस्ते अमर जवान प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शौर्यपदकधारक नाईक बजरंग मोरे, शहीद कॅप्टन प्रेमकुमार पाटील यांचे वडील कृष्णा पाटील व आई राधा पाटील तसेच माजी सैनिक अरुण आठल्ये, शंकर मिल्के, बाळकृष्ण शिंदे व १९७१च्या युद्धामध्ये सहभागी झालेले एकनाथ सकपाळ, चंद्रकात पवार, कदम, मोहन सातव यांचा सन्मान करण्यात आला.
ध्वज दिन निधीसाठी ६१ हजार रुपये देणाऱ्या शुभदा साठे, ११ हजार देणाऱ्या वैदेही रायकर, पाच हजारांचा निधी देणारे जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिराजदार यांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी लक्ष्मीकांत गवळी यांनी सूत्रसंचालन केले.