पाण्याअभावी अजून ४५ जलशिवारे कोरडी
By admin | Published: May 2, 2016 11:32 PM2016-05-02T23:32:57+5:302016-05-03T00:52:26+5:30
जलशिवार अभियान : प्रत्येक तालुक्यातून ५ गावांची निवड
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे जलशिवार अभियानाला गतवर्षी प्रारंभ झाला. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, कोरडवाहू शेती अभियान व गतिमान पाणलोट कार्यक्रमाचे नियोजन यामध्ये करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून पहिल्या टप्यात पाच गावांची निवड या अभियानासाठी करण्यात आली. जिल्ह्यातील १६३३ कामांपैकी १४४५ कामे पूर्ण झाली तरीही जलशिवारे मात्र पाण्याअभावी आजही कोरडीच आहेत.
जिल्ह्यासाठी पहिल्या टप्यात १६३३ कामांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी १४४५ कामे पूर्ण झाली आहेत. अद्यापही उर्वरीत १८८ कामे सुरू आहेत. या कामांसाठी ३३ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. पैकी १३ कोटी ३९ लाख ६६ हजार रूपये आत्तापर्यंत जलशिवारांवर खर्च झाला आहे. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. मात्र, सदरची योजना राबवूनही शिवारे मात्र कोरडीच राहिली असून, जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत टँकरग्रस्त गावांची निवड करण्यात आली होती. नऊ तालुक्यांमधील ही टँकरग्रस्त गावे टँकरमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. शासनातर्फे जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पाही निश्चित करण्यात आला आहे. मात्र, दुसऱ्या टप्यात नऊ तालुक्यांमधील प्रत्येकी तीन गावांची निवड करण्यात आलीे आहे.
जलशिवार योजनेंतर्गत नदी, ओढ्यांवर विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात आले आहेत. जेणेकरून या गावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी. मात्र, यावर्षी सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलशिवार योजनेंतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांबरोबरच अन्य गावांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
केवळ बंधारे बांधण्यापेक्षा नद्या, विहिरी, ओढे यांच्यातील साचलेला गाळ उपसणे आवश्यक आहे. यामुळे पाण्याचे झरे पुनर्जीवित होतील व पाण्याच्या पातळीमध्येही वाढ होईल. जलशिवार योजनेच्या पहिल्याच वर्षी पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी ही शिवारे कोरडी पडली आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाला तर या शिवारांच्या पाणी पातळीमध्ये निश्चित वाढ होईल. यातून शासनाची कोट्यवधी रूपये खर्चून उभारलेली जलशिवार योजना यशस्वी झाली, असे म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)
पाणीटंचाईची झळ : कोट्यवधी पाण्यात
जिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी आत्तापर्यंत १३ कोटी ३९ लाख ६६ हजार रूपये खर्च करून जलशिवारांची कामे करण्यात आली. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ व्हावी यासाठी ही कामे तयार करण्यात आली. मात्र, जलशिवारांची कामे करूनही पाणीटंचाईची झळ बसतच आहे.