रत्नागिरीत 45 लाखांचे कोकेन जप्त, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:01 PM2019-07-21T13:01:28+5:302019-07-21T13:03:58+5:30
स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी रत्नागिरी एमआयडीसीत छापा घालून सुमारे 45 लाखांचे 930 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.
रत्नागिरी - स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनीरत्नागिरी एमआयडीसीत छापा घालून सुमारे 45 लाखांचे 930 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एक कोस्टगार्ड कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे.
मोठ्या शहरांप्रमाणे आता कोकणातही अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने अंमली पदार्थांच्या विळख्यात येथील तरुण वळत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिनेश सिंह (हरियाणा), सुनील कुमार, नरेंद्र कुमार रनवा (राजस्थान) व रामचंद्र मलिक (हरियाणा) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक तरुण कोस्टकार्डमध्ये नोकरीला असल्याचे कळते.
रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे पोलिसांना खबर मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली होती .परंतु यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असावा असा पोलिसांचा संशय होता. एमआयडीसी परिसरात कोकेनची विक्री होणार असल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिरीष सासणे यांना खबऱ्याने खबर दिली होती. याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे याना सासणे यांनी दिली. त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्यासह पोलिसांचे पथक तयार करून आरोपींवर पाळत ठेवली. शनिवारी 8 वाजता हे तिघेजण एमआयडीसी परिसरात कोणाची तरी वाट पाहताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीचा कोकेन जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोकेन जप्त होण्याची जिल्ह्यातील मोठी घटना आहे.