कुठे कुठे शोधणार वारसदार?, मुंबई-गोवा महामार्गाचा साडेचार टक्के मोबदला पडून
By शोभना कांबळे | Published: September 3, 2022 11:47 AM2022-09-03T11:47:44+5:302022-09-03T11:49:22+5:30
काही गावांमध्ये वारसांनी काही वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याने त्यांचे पत्ते शोधणे अवघड
शोभना कांबळे
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील १०१ गावांना आतापर्यंत १९८४ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, काही वारसदारांना नोटीसा पाठवूनही त्यांनी मोबदल्याची रक्कम न नेल्याने सुमारे साडेचार टक्के मोबदल्याची रक्कम अजूनही प्रशासनाकडे पडून आहे. काही गावांमध्ये वारसांनी काही वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याने त्यांचे पत्ते शोधणे अवघड झाले आहे.
२०६.२६ किलोमीटरच्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ साठी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या सहा तालुक्यांमधील १०१ गावांमधील ४४१.४७ इतके क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. भूसंपादन संस्थेकडून निवाडा जाहीर झाल्यानंतर मार्च २०१७ सालापासून जमीनमालकांना माेबदला देण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या १०१ गावांसाठी २०७७ कोटी २८ लाख एवढा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे. त्यापैकी या गावांतील खातेदारांना १९८४.२४ कोटी (९५.५२ टक्के) एवढी मोबदल्याची रक्कम वितरीत करण्यात आली आहे तर ९३.०४ कोटी (४.४८ टक्के) एवढा निधी प्रशासनाकडे अजूनही जमा आहे.
काही खातेदार मुंबई किंवा अन्य शहरात नोकरी, धंद्यानिमित्त स्थलांतरीत झालेले आहेत. त्यामुळे काहींचे प्रकरण न्यायालय प्रविष्ठ असल्याने त्याचा निर्णय प्रलंबित असल्याने हा निधी अद्याप वितरीत झालेला नाही. त्याचबरोबर काही खातेदारांच्या पत्त्यावर मोबदल्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र, काही खातेदार त्या पत्त्यावर राहात नसल्याने त्यांचाही मोबदला अद्याप पडूनच आहे. त्यामुळे मोबदल्याची रक्कम सुमारे ९६ टक्के वितरीत करण्यात आली असली तरी उर्वरित साडेचार टक्के निधीत वारसच आले नसल्याचे प्रमाण जास्त आहे.