संगमेश्वरात ५९५ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया

By admin | Published: March 4, 2015 09:41 PM2015-03-04T21:41:32+5:302015-03-04T23:41:05+5:30

अल्प प्रतिसाद : १० महिन्यांत केवळ ६१ टक्के उद्दीष्ट पूर्णत्त्वास

5 5 5 Family Welfare Surgery in Sangameshwar | संगमेश्वरात ५९५ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया

संगमेश्वरात ५९५ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया

Next

मार्लेश्वर : शासनामार्फत संगमेश्वर तालुक्याला एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीसाठी ९७३ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत १० महिन्यांमध्ये सुमारे ५९५ शस्त्रक्रिया पूर्णत्त्वास गेल्या आहेत. त्यामुळे केवळ ६१ टक्के इतके शस्त्रक्रियेचे काम झाले आहे. उर्वरित दोन महिन्यांमध्ये उर्वरित ३९ टक्के उद्दिष्ट पूर्णत्त्वास जाईल का, हे पाहवे लागणार आहे.‘एक मूल, सौख्य विपुल’ हा नारा देत कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे महत्त्व ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पटवून दिले आहे. गर्भधारणा रोखण्यासाठीसुद्धा शासनाने विविध साधनांची निर्मिती करुन त्याचाही प्रचार व प्रसार ग्रामीण भागापर्यंत केला आहे. सद्यस्थितीला गर्भधारणा रोखणाऱ्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे साहजिकच कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळत आहे.मात्र, तरीसुद्धा शासनाने कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेवर अधिक भर दिला आहे. या शस्त्रक्रियेचे महत्त्व ग्रामीण भागातील महिलांना पटवून देण्यासाठी अंगणवाडीसेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, आशा यांच्याकडे हे काम सोपवले आहे. त्यानुसार त्यांच्यामार्फत हे काम चोखपणे पार पाडले जात आहे.तालुक्याला ९७३ कुटूंबकल्याण शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यानुसार माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात ७०, धामापूर ६६, कडवई ६२, कोंडउमरे ५५, साखरपा ५२, सायले ४९, फुणगूस ४९, देवळे ४७, साखरपा बुरंबी ४२, निवेखुर्द ४१, देवरुख ग्रामीण रुग्णालय १५, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय ५ अशा एकूण ५९५ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामध्ये देवरुख ग्रामीण रुग्णालय धामापूर आरोग्य केंद्र व सायले आरोग्य केंद्रात प्रत्येकी १ पुरुष शस्त्रक्रिया पार पडली आहे. (वार्ताहर)


एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीसाठी ९७३ शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट.
सद्यस्थितीला गर्भधारणा रोखणाऱ्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे साहजिकच कुटूंबकल्याण शस्त्रक्रियेला अल्प प्रतिसाद.
देवरुख ग्रामीण रुग्णालय धामापूर आरोग्य केंद्र व सायले आरोग्य केंद्रात प्रत्येकी १ पुरुष शस्त्रक्रिया.

Web Title: 5 5 5 Family Welfare Surgery in Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.