‘आमआदमी’ना राजापुरात ५ लाख ४० हजारांची मदत
By Admin | Published: December 17, 2014 09:48 PM2014-12-17T21:48:06+5:302014-12-17T22:56:44+5:30
केंद्र शासनाची योजना : १८ कुटुंबांना मिळाला लाभ
राजापूर : केंद्र शासनाच्या आमआदमी योजनेंतर्गत राजापूर तालुक्यातील १८ कुटुंबांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजारप्रमाणे ५ लाख ४० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन व अल्पभूधारक लोकांना शासनाकडून आम आदमी योजना सुरु असून, एक एकरापेक्षा कमी बागायती व पाच एकरपेक्षा कमी जिरायती शेती असलेल्या ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.
आमआदमी या योजनेला पात्र असलेल्या कुटुंबाच्या कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, तर अपघाती मृत्यू झाल्यास ३५ हजार रुपये, दोन्ही डोळे व पाय निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, एक डोळा व पाय निकामी झाल्यास ३७ हजार रुपयांची मदत देण्यात
येते.
राजापूर तालुक्यात या योजनेतून दीपिका बिर्जे (शीळ), अश्विनी बेहेरे (चुना कोळवण), रश्मी रघुनंदन नारकर, मंदा महादेव मांजरेकर (जैतापूर), प्रिया प्रकाश कणेरी (अणसुरे), नम्रता नंदकुमार कोरगावकर (वाडीखुर्द), शालिनी चंद्रकांत जाधव (कळसवली), सुप्रिया नांदगावकर (अडविरे), रक्षिता शिरगावकर (तुळसुंदे), प्रमिता मणचेकर (सागवे), अन्नपूर्णा दैत (ओणी), सीमा भाटकर (जांभारी), सुनीता पोवार (धोपेश्वर), जयश्री पडवळ (मूर), रंजना नाडणकर (शिवणे बु.), मीनल लोळगे (गोठणे दोनिवडे), सुलोचना शिंदे (धोपेश्वर) यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
आमआदमी योजनेचा लाभ तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर घ्यावा. तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन व अल्पभूधारक लोकांना शासनाकडून आमआदमी योजना राबविण्यात येत आहे.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राजापूर तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येक कुटुंबाला ३० हजारांची मदत.
दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन व अल्पभूधारकांना मिळतो योजनेचा लाभ.
कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास मिळते ३० हजारांची मदत.