पुरात वाहून गेलेल्या प्राैढाच्या नातेवाइकांना ५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:36 AM2021-08-20T04:36:38+5:302021-08-20T04:36:38+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथे पुरामध्ये वाहून मृत झालेल्या तरुणाच्या वारसांना शासनातर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथे पुरामध्ये वाहून मृत झालेल्या तरुणाच्या वारसांना शासनातर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. ही माहिती देवरूख तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.
आंगवली लाखणवाडी येथील दिलीप शिवराम लाखण हे २२ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता पत्नी सुवर्णा लाखन व त्यांची मुलगी हे तिघे जण आंगवली येथे रेशन नेण्यासाठी रास्त धान्य दुकानावर आले होते. आंगवली बौद्धवाडी येथे प्रेत झाल्याने धान्य घेऊन झाल्यानंतर दिलीप लाखन हे आंगवली बौद्धवाडीकडे रवाना झाले. या कालावधीत मुसळधार पाऊस कोसळत होता. दिलीप लाखण सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत न आल्याने सर्वत्र शोधाशोध, चौकशी करण्यात आली. मात्र, थांगपत्ता न लागल्याने दिलीप लाखण बेपत्ता झाल्याची फिर्याद सुवर्णा लाखण यांनी देवरूख पोलीस स्थानकात दिली होती.
शोध मोहीम सुरू असताना दोन दिवसांनी आंगवली येथे बाव नदीपात्रात लाखण यांचा मृतदेह आढळला. पुराच्या पाण्यात वाहून त्यांचा मृत्यू झाल्याने शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत सुवर्णा लाखण यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती देवरूख तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.