संगमेश्वरात एकाच वर्षात ५ बिबटे, २ गवे, एका सांबराचा मृत्यू, उपासमारीमुळे बिबट्यांच्या मृत्यूत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:18 PM2022-06-06T18:18:37+5:302022-06-06T18:52:38+5:30

भूकबळीमुळे बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी संगमेश्वर तालुक्यातील सहा बिबटे मिळाले. चार बिबटे विहिरीत कोसळण्याचा प्रकार घडला.

5 leopards, 2 Gaur, one sambar die in Sangameshwar in one year, death of leopards increased due to starvation | संगमेश्वरात एकाच वर्षात ५ बिबटे, २ गवे, एका सांबराचा मृत्यू, उपासमारीमुळे बिबट्यांच्या मृत्यूत वाढ

संगमेश्वरात एकाच वर्षात ५ बिबटे, २ गवे, एका सांबराचा मृत्यू, उपासमारीमुळे बिबट्यांच्या मृत्यूत वाढ

googlenewsNext

सचिन मोहिते

देवरुख : भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडून तसेच उपासमारीमुळे बिबट्यांचा मृत्यू हाेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. मात्र, आता बिबट्यांबराेबरच अन्य वन्य प्राण्यांचाही मृत्यू हाेऊ लागला आहे. संगमेश्वर तालुक्यात एका वर्षात ५ बिबटे, १ सांबर व ५ गवारेडा यांचा मृत्यू झाल्याची माहिती देवरुखचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी दिली आहे. तालुक्यात बिबट्या व गवा रेडे यांचा मृत्यू हाेणे ही बाब चिंताजनक आहे.

संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील गाव व वाड्या या डोंगरांमध्ये वसलेल्या आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. जंगले नष्ट होत असल्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीमध्ये येत आहेत. पाळीव मांजरे, श्वान, कोंबड्या, गाई, बैल यांच्यावर बिबट्या भरदिवसाही हल्ला चढवतात.

लक्ष्याचा पाठलाग करताना बिबटे विहिरीमध्ये कोसळण्याचा प्रकारही घडला आहे. तसेच भूकबळीमुळे बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी संगमेश्वर तालुक्यातील सहा बिबटे मिळाले. चार बिबटे विहिरीत कोसळण्याचा प्रकार घडला. यातील ३ जणांचा मृत्यू झाला असून एका बिबट्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. जंगलात दोन बिबटे मृतावस्थेत सापडले आहेत. कळंबस्ते, पिरंदवणे, कनकाडी, देवधामापूर,मोर्डे, हरपुडे या ठिकाणी बिबटे मिळून आले आहेत.

गतवर्षी नारडुवे, अंबावली, पाचांबे या ठिकाणी गवारेडे विहिरीत पडण्याचे प्रकार घडले हाेते. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या गवारेड्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवदान दिले आहे. किरबेट येथे झुंजीमध्ये दोन गव्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोंडउमरे येथे कड्यावरून कोसळून एका सांबराचा मृत्यू झाला आहे.

संगमेश्वर तालुक्यात वनपाल म्हणून तौफिक मुल्ला, वनरक्षक म्हणून नानू गावडे, राजाराम पाटील, आकाश कडूकर, अरुण माळी हे कार्यरत आहेत. ही टीम वन्य प्राण्यांचा मृत्यू न हाेण्याकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.

जनावरांमुळे १४७ शेतकऱ्यांचे नुकसान

पाळीव व वन्य प्राण्यांकडून भात, काजू, आंबा, केळी आदी पिकांची नासधूस केली जाते. गतवर्षी १४७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यातील ५६ शेतकऱ्यांना ४ लाख ४५ हजार ८७५ इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. अजूनही ९१ शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: 5 leopards, 2 Gaur, one sambar die in Sangameshwar in one year, death of leopards increased due to starvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.