रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 03:12 PM2024-05-25T15:12:59+5:302024-05-25T15:13:18+5:30
विकासकामांचा घेतला आढावा
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जसे मुंबई आणि ठाणे येथे रुग्णालये सुरू झाली आहेत त्याच धर्तीवर रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयामध्ये केवळ एका केसपेपरच्या आधारावर तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्यातील लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात आलेल्या सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ७७ कोटी रुपये मंजूर असलेल्या जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत इमारत पूर्ण होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० कोटींच्या प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे.
नगर परिषदेची नूतन इमारत अंतिम टप्प्यात आहे, तर रत्नागिरी पंचायत समितीचे नूतन इमारतीचे काम ९० टक्के झाले असून, लवकरच ही इमारत पूर्ण होईल. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे कामही येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला. रहाटाघर बस स्थानकातील काँक्रिटीकरणासह इतर कामे १५ दिवसांत पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले.
मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे ६० कोटींचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, ४१ कोटींच्या सुशोभीकरणाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील पशुसंवर्धन दवाखान्याची इमारत उद्घाटनासाठी तयार आहे, असेही ते म्हणाले.
छत्रपतींचा पुतळा
रत्नागिरी शहरातील शिवसृष्टीचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, येत्या महिनाभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक नूतनीकरणाचा पहिला भाग पूर्ण झाला असून, तेथील उजव्या इमारतीमध्ये संशोधन केंद्र आणि वाचनालय सुरू केले जाईल, असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
अमिताभ बच्चन यांचा आवाज
थ्रीडी मल्टिमीडियाचे काम पूर्णत्वास आले असून १५ ऑगस्टला त्याचे लोकार्पण होणार आहे. या थ्रीडी मल्टिमीडियामध्ये मराठीसाठी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह हिंदी आणि इंग्रजी आवाजासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज असेल, असं त्यांनी सांगितले.
साईडपट्ट्यांचे काम लवकरच
रत्नागिरी शहरातील काँक्रिटीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. हे काम पूर्णत्वास आले असून इतर रस्त्यांचे कामे अंतिम टप्प्यात आहेत. साईडपट्ट्यांचे रखडलेले कामही लवकरच पूर्ण होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.